साखळी ओढल्यावर ट्रेन कशी थांबते? विनाकरण केल्यास होऊ शकते शिक्षा

भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या आपत्कालीन परिस्थितीसाठी ट्रेनमध्ये साखळी ओढून ती थांबविण्याची सुविधा दिली आहे. ही साखळी ट्रेनच्या डब्यात वरच्या बाजूला लावलेली असते, जी अनेक प्रवाशांनी नक्कीच पाहिली असेल. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की साखळी ओढल्यावर ट्रेन थांबते तरी कशी? आणि जर ही सुविधा इतकी सहज आहे, तर प्रवासी ट्रेन थांबल्यावर का उतरत नाहीत? चला तर मग जाणून घेऊयात साखळी ओढल्यावर ट्रेन कशी थांबते आणि प्रवासी उतरल्यावर काय गुन्हा दाखल होऊ शकतो.

 

साखळी ओढल्यावर ट्रेन कशी थांबते?

Related News

मिळालेल्या माहितीनुसार, ट्रेनच्या डब्यातील साखळी ब्रेक पाईपशी जोडलेली असते. पाईपमध्ये पूर्ण दाब असतो, जो ट्रेनच्या वेगाला नियंत्रित ठेवतो. साखळी ओढल्यावर ब्रेक पाईपमधील व्हॉल्व्ह उघडला जातो आणि हवेचा दाब कमी होतो. परिणामी, ब्रेक सक्रिय होतो आणि ट्रेनचा वेग कमी होतो. लोको पायलट प्रेशर मीटरवर हा बदल पाहतो, तीन वेळा हॉर्न वाजवतो आणि ट्रेन थांबवतो. ट्रेन थांबल्यानंतर गार्ड व सुरक्षा कर्मचारी परिस्थिती तपासतात आणि आपत्कालीन स्थितीत साखळी ओढली गेल्याचे समजल्यास ती तात्काळ हाताळली जाते.

 

प्रवासी कुठेही थांबल्यावर का उतरत नाहीत?

अनेक प्रवाशांना प्रश्न पडतो की जर ट्रेन साखळी ओढून थांबवता येते, तर ते कुठेही उतरण्याचा प्रयत्न का करत नाहीत? याचे कारण रेल्वे कायदा 1989 अंतर्गत साखळी ओढण्याचा वापर केवळ आपत्कालीन परिस्थितीत करण्याची परवानगी आहे. यामध्ये आग, आरोग्य आणीबाणी, गुन्हेगारी घटना किंवा अपघातासारख्या गंभीर परिस्थितींचाच समावेश आहे. अन्य कोणत्याही कारणासाठी साखळी ओढल्यास, प्रवाशांना 1 वर्षाचा तुरुंगवास, 1,000 रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकते.

याशिवाय, ट्रेन कुठेही थांबल्यावर लगेच उतरणे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी धोकादायक ठरू शकते. रुळावर उतरल्यास अपघाताचा धोका वाढतो, तसेच यामुळे इतर प्रवाशांनाही गैरसोयीचा सामना करावा लागतो. त्यामुळे ही सुविधा आपत्कालीन परिस्थितीसाठीच वापरावी, अन्यथा कायदेशीर कारवाई होऊ शकते. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना साखळीचा दुरुपयोग न करता, ती केवळ अत्यावश्यक प्रसंगी वापरण्याचे आवाहन केले आहे.

Related News