दोघेही नांदेडचे रहिवासी
अमरावती : गाडगेनगर पोलिस स्टेशन परिसरातील होंडा शोरुम समोर ३१ ऑक्टोबर रोजी रात्री उशिरा झालेल्या अपघातात दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. दोघही नांदेडचे रहिवासी होते. ते व्यवसायानिमित्त अमरावतीत मामाकडे आले होते. या घटनेमुळे राठोड कुटूंबियांवर शोककळा पसरली.
चेतन सोहनलाल राठोड वय ३२ आणि रोहण सोहनलाल राठोड वय २५ अशी मृतकांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार चेतन राठोड, व रोहन राठोड हे दोघेही सख्खे भाऊ असुन ते दोघेही नांदेडचे रहिवासी होते. ते अमरावती महेद्र काॅलनी येथे आपले मामा यादव यांच्या घरी व्यवसायानिमित्त आले होते. गुरुवारी रात्री दोघही भाऊ आपल्या अन्य दोन मित्रांसह दुचाकीवरुन हाॅटेलवर जेवायला गेले होते. तेथून रात्री उशिरा दोन वाजेच्या सुमारास मामाच्या घरी परतत असताना गाडगेनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील होंडा शोरुम समोर राठोड बंधूची पल्सर मोटरसायकल घसरुन दुभाजकावर आढळली दुचाकी जास्त वेगात असल्याने दोघांनाही गंभीर दुखापत झाली असता दोघांनाही गंभीर अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असता तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. अपघात झाला त्यावेळी दोघेही मित्र त्यांच्या दुचाकीवरुन पुढे निघालेले होते. अपघाताची माहिती मिळताच ते मित्र आणि गाडगेनगर पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी यादव व राठोड कुटूंबियांना घटनेची माहिती दिली. अपघातात दोघेही भावांचा मृत्यू झाल्याने यादव व राठोड परिवारात शोककळा पसरली होती. याप्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला आहे.