अकोट: सातपुड्याच्या पायथ्याशी डेरा जमवून अवैध गौणखनिज वाहतूक करणाऱ्या मुरुम माफियांवर महसूल विभागाने धडक कारवाई केली आहे. उपविभागीय अधिकारी व तहसीलदार अकोट यांच्या मार्गदर्शनाखाली अकोट मंडळ अधिकारी गणेश भारती, ग्राम महसूल अधिकारी गोपाल वानरे आणि रितेश मेंढे यांनी मोहाळा ते पोपटखेड रोडवर विशेष तपासणी केली. गाजीपूर गौण खनिज चेकपोस्टवर या कारवाई दरम्यान मागोमाग चार डंपर जप्त करण्यात आले आहेत. तपासात असे आढळले की, या वाहनांमध्ये वाहतूक परवान्यापेक्षा अधिक मुरुम भरले गेले होते. म्हणजेच शासनाची सरळसरळ फसवणूक केली जात असल्याचे स्पष्ट झाले. महसूल विभागाने सदर डंपर थेट अकोट तहसील कार्यालयात जमा करून दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. मात्र, स्थानिक नागरिकांचा रोष वाढला असून, फक्त दंडात्मक कारवाई पुरेशी नसून अवैध मुरुम माफियांविरोधात चोरी आणि शासन फसवणुकीचे गुन्हे दाखल करावे, अशी मागणी जोरदार पद्धतीने केली जात आहे. सातपुड्याच्या पायथ्याशी सुरू असलेली अवैध मुरुम लूट थांबवणे ही नागरिकांची मुख्य अपेक्षा आहे. महसूल विभागाच्या या कडक कारवाईमुळे स्थानिक प्रशासनाचे जबाबदारीवर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन वाढले आहे.
read also:https://ajinkyabharat.com/chaitanyanandchaya-sansthet-mulinwar-terrible-atrocities/
