BSF जवानांच्या कलेला सलाम! ‘VOICE OF BSF’ राष्ट्रीय गायन स्पर्धेचा समारोप ९-१० मार्चला मुंबईत

VOICE OF BSF

सीमा सुरक्षा दलातील (BSF) जवान आणि अधिकाऱ्यांमधील कलागुणांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी आयोजित करण्यात आलेली VOICE OF BSF – BSF Talent Hunt ही राष्ट्रीय स्तरावरील गायन स्पर्धा आणि ‘सलामी २०२६’ या सांस्कृतिक उपक्रमाचा भव्य समारोप ९ व १० मार्च २०२६ रोजी मुंबईतील दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक येथे होणार आहे.

मुक्ता इव्हेंट्स अँड हॉस्पिटॅलिटी प्रा. लि. यांच्या आयोजनातून, निमना फाऊंडेशन मुंबई, स्वर्ण स्वर इंटरटेनमेंट आणि एकता मंच मुंबई यांच्या सहकार्याने हा सोहळा पार पडत आहे. कला क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत उपांत्य फेरी, अंतिम फेरी, महाअंतिम फेरी तसेच पारितोषिक वितरण सोहळा संपन्न होणार आहे.

‘सलामी’ या उपक्रमाचा यशस्वी प्रवास
हिंदुस्थानच्या सीमेवर तैनात असलेल्या जवानांच्या करमणुकीसाठी ‘सलामी’ हा विशेष सांस्कृतिक उपक्रम १ ते १२ फेब्रुवारी २०२६ दरम्यान राजस्थान राज्यातील जोधपूर, पोकरण, जैसलमेर, ब्रम्हसर, रामगढ, बबलीयनवाला, खाजूवाला, सांचू आणि बिकानेर सेक्टर या सीमावर्ती भागात आयोजित करण्यात आला होता. या दौऱ्यात ४५ कलावंत व तंत्रज्ञांनी सहभाग घेत जवानांचे मनोरंजन केले.

जवानांच्या कलेतून ‘VOICE OF BSF’चा जन्म
२०१५ पासून सीमा सुरक्षा बलासाठी सांस्कृतिक कार्यक्रम करत असताना डॉ. संतोष परब यांच्या लक्षात आले की BSF मधील अनेक जवान व अधिकारी उत्कृष्ट गायक आहेत. त्यांच्या या कलागुणांना व्यासपीठ मिळावे या हेतूने ‘VOICE OF BSF’ ही राष्ट्रीय स्तरावरील गायन स्पर्धा सुरू करण्यात आली. सीमा सुरक्षा बलाच्या दिल्ली मुख्यालयाने या संकल्पनेला अधिकृत परवानगी दिली असून BSF च्या ६० वर्षांच्या इतिहासात तिसऱ्यांदा ही स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे.

१४० जवानांचा सहभाग
२० जानेवारी ते १३ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत पहिल्या टप्प्यात ऑनलाईन पद्धतीने १४० जवान व अधिकाऱ्यांनी सहभाग नोंदविला. त्यातून निवडलेल्या स्पर्धकांमध्ये उपांत्य व अंतिम फेरी होणार असून ४० पैकी ३६ जवान पहिल्यांदाच मुंबईत येणार आहेत.

विजेत्यास TVS ची नवी कोरी बाईक
या वर्षीच्या विजेत्यास TVS या दुचाकी कंपनीकडून नवी कोरी बाईक भेट म्हणून दिली जाणार आहे. तसेच सर्व सहभागी जवान आणि अधिकाऱ्यांना सन्मानचिन्ह व भेटवस्तू देऊन गौरविण्यात येणार आहे.

मान्यवर परीक्षकांची उपस्थिती
या स्पर्धेसाठी संगीतकार श्रीरंग आरस, मनोहर गोलांबरे, मालिका दिग्दर्शक विवेक देशपांडे, अभिनेत्री माधुरी नारकर, प्रदीप कडू आणि पुरुषोत्तम बेर्डे हे मान्यवर परीक्षक म्हणून काम पाहणार आहेत.

अनेक मान्यवरांचे सहकार्य
या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंजिरी मराठे, किसन जाधव, नाना आंबोले, नगरसेवक यशवंत किल्लेदार, मंदार फणसे, गोपाळ खाड्ये, दीपक बागवे, अशोक सावंत, बाळा खोपडे, प्रदीप कडू, डॉ. सुनिल हळूरकर, निखिल जाधव, अंकेश जैन, डॉ. जितेंद्र जाधव, डॉ. शर्मिला जाधव यांच्यासह अनेक मान्यवरांनी विशेष परिश्रम घेतले आहेत.

या सोहळ्यास मुंबईतील उद्योजक, कलावंत आणि ‘सलामी’ व ‘VOICE OF BSF’ या संकल्पनेचे हितचिंतक उपस्थित राहणार आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे सहकार्य लाभलेल्या या उपक्रमाची संकल्पना, लेखन, दिग्दर्शन, आयोजन आणि नियोजन डॉ. संतोष परब यांनी केले आहे.

read also :  https://ajinkyabharat.com/mamatas-absence-from-president-murmus-reception-angers-modis-system/