बंडावेळी ठाकरेंनी मलाही मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली! शिंदेंचाही मोठा गौप्यस्फोट

बंडावेळी ठाकरेंनी मलाही मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिलेली! फडणवीसांनंतर शिंदेंचाही मोठा गौप्यस्फोट

नाशिक : ‘शिवसेनेतील बंडानंतर उद्धव ठाकरे यांनी मला मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली होती’, या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गौप्यस्फोटात सत्यता असल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. ‘आम्ही बाहेर गेलो, तेव्हा ठाकरे यांनी मलाही फोन करून मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली होती. त्यांनी दिल्लीतही संपर्क साधून, यांना कशाला घेता, आम्हीच येतो असाही निरोप दिला होता. परंतु, त्यांच्याकडे शिवसेना राहिलीच नव्हती. ५० आमदार माझ्यासोबत होते. त्यामुळे फडणवीस यांच्या बोलण्यात वस्तुस्थिती आहे’, असा दावा शिंदे यांनी केला. ‘आणखी बऱ्याच गोष्टी आहेत. मात्र त्या मी बोलू इच्छित नाही’, असा इशाराही शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना दिला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महायुतीच्या उमेदवारांचा अर्ज दाखल करण्यासाठी गुरुवारी नाशिक दौऱ्यावर असताना ते वार्ताहरांशी बोलत होते. ‘उद्धव ठाकरे यांनी आम्हाला फोन केले होते. मात्र, मुख्यमंत्री बनण्यासाठी मी हा निर्णय घेतला नव्हता. बाळासाहेबांच्या विचारांशी फारकत घेतली गेली, त्यावेळी वैचारिक भूमिका घेऊनच आम्ही गेलो होतो’, असे त्यांनी सांगितले. ‘विरोधकांकडे आता शिव्याशाप देणे आणि डिवचणे इतकेच काम उरले आहे. या निवडणुकीनंतर त्यांच्याकडे काहीच उरणार नाही. आता सरकार बदललेले आहे, हे विरोधक मानायला तयार नाहीत’, असा टोला शिंदे यांनी लगावला. ‘जे काँग्रेसला करता आले नाही, ते काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहा वर्षांत करून दाखविले. महायुतीनेही दोन वर्षांत अनेक कामे केली आहेत. त्यामुळे मतदार आमच्या कामाची पोचपावती देतील. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महायुती काम करीत नाही. २४ तास आमचे काम सुरू असते. निवडणुका असो अथवा नसो, आम्ही काम करतो. घरात बसून किंवा फेसबुक लाइव्ह करून आम्ही काम करीत नाही,’ असेही ते म्हणाले.

Related News