Anil Ambani CBI Raid :
उद्योगपती अनिल अंबानी यांच्या घरासह अनेक ठिकाणी आज सकाळपासून केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (CBI) मोठी छापेमारी सुरू केली आहे.
सकाळी ७ वाजल्यापासून सुरू झालेल्या या कारवाईने उद्योगविश्वात मोठी खळबळ उडाली आहे.
१७ हजार कोटींचा बँक कर्ज घोटाळा
सूत्रांच्या माहितीनुसार, अंबानी समूहातील काही कंपन्यांनी बनावट संस्थांच्या माध्यमातून हजारो कोटी रुपयांचे बँक कर्ज वळवल्याचा गंभीर आरोप आहे.
या प्रकरणात एकूण १७ हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. यामुळे स्टेट बँक ऑफ इंडियासह अनेक बँकांचे मोठे नुकसान झाले आहे.
कफ परेड येथील आलिशान घरावर छापा
CBI चं ६-७ अधिकाऱ्यांचं पथक अनिल अंबानी यांच्या मुंबईतील कफ परेड येथील आलिशान निवासस्थानी छापेमारी करत असून, महत्त्वाची कागदपत्रं आणि पुरावे जप्त केले जात आहेत. कारवाईच्या वेळी अनिल अंबानी घरात असल्याची माहिती समोर आली आहे.
आधी ED ची चौकशी
या प्रकरणात यापूर्वी सक्त वसुली संचालनालयाने (ED) अनिल अंबानी आणि त्यांच्या कंपन्यांची चौकशी केली होती.
ईडीने जुलै महिन्यातच ५० व्यावसायिक संस्था आणि २५ खासगी ठिकाणी धाड घातली होती. त्यावेळी अनेक अनियमितता उघड झाल्या होत्या, जसे की –
कोणतीही शहानिशा न करता कर्ज मंजूर करणे
शेल कंपन्यांच्या नावावर कर्ज घेणे
आवश्यक कागदपत्रांचा अभाव
कर्ज फेडण्यासाठी नव्याने कर्ज घेणे
आरोप गंभीर
२०१७ ते २०१९ या काळात यस बँकेकडून अनिल अंबानी यांच्या कंपन्यांना अवैध पद्धतीने कर्ज हस्तांतरीत करण्यात आलं असल्याचा आरोप आह.
या प्रकरणात रिलायन्स कम्युनिकेशन्सच्या प्रमोटर्सविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या छापेमारीमुळे उद्योगविश्वात खळबळ उडाली असून, पुढील तपासामुळे आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.