बाळापूर – तालुक्यातील मोजे वाडेगाव येथे आत्मा योजनेअंतर्गत किसान गोष्टी कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमात अमरवेल (अधरवेल) या परोपजीवी तणाच्या नियंत्रणासाठी सामूहिकरीत्या एकात्मिक व्यवस्थापन
पद्धतींचा अवलंब करणे आवश्यक असल्याचे मत अखिल भारतीय समन्वित तण व्यवस्थापन संशोधन प्रकल्पाचे प्रमुख
शास्त्रज्ञ डॉ. विकास गौड यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाला कीटकशास्त्रज्ञ डॉ. गजानन लांडे, डॉ. धीरज कराळे, तालुका कृषी
अधिकारी सागर डोंगरे, तसेच आत्मा यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते.
डॉ. गौड यांनी सांगितले की, अमरवेलचा प्रादुर्भाव द्विदल पिकांवर झपाट्याने वाढत असून, प्रतिबंधात्मक, निवारणात्मक
उपाय व रासायनिक पद्धती एकत्रित वापरल्यास त्यावर प्रभावी नियंत्रण मिळवता येते.
डॉ. गजानन लांडे यांनी शेतकऱ्यांना हुमणी अळी नियंत्रणासाठी जैविक व पर्यावरणपूरक उपायांचा अवलंब करण्याचे मार्गदर्शन केले. मेटारायझियमसारख्या जैविक कीडनाशकाचा वापर करावा तसेच निंबोळी अर्क फवारणी व कामगंध सापळे
उपयोगी ठरतात, असे त्यांनी स्पष्ट केले.डॉ. धीरज कराळे यांनी सोयाबीन–तूर लागवडीसाठी सरी-वरंबा पद्धतीचे फायदे
सांगितले. तसेच ट्रॅक्टरचलित अवजारांच्या देखभालीबाबत मार्गदर्शन केले. यावेळी कृषी अधिकारी सागर डोंगरे यांनी कृषी
विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली.कार्यक्रमाचे संचालन आत्माचे तालुका तंत्र व्यवस्थापक विजय शेगोकार यांनी
केले तर आभार रामेश्वर मोरे यांनी मानले. परिसरातील शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.
Read also :https://ajinkyabharat.com/mundgaon-yehethe-poanantar-dwarka-festival-excited-sajra/