छत्रपती शिवाजी महाराज चौकात शोकसभा; सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित दादा पवार यांच्या अपघाती निधनाच्या दुःखद वार्तेने संपूर्ण राज्यासह कोरपना तालुक्यात शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनाने केवळ एका राजकीय नेत्याचे नव्हे, तर जनसामान्यांचा खंबीर आधारस्तंभ हरपल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
अजित दादा पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक कणखर, स्पष्टवक्ते आणि कार्यक्षम नेतृत्व म्हणून ओळखले जात होते. सहा वेळा उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री म्हणून त्यांनी जबाबदारीने काम करत राज्याच्या विकासात मोलाची भूमिका बजावली. सर्व समाजघटकांचा विचार करून लोककल्याणकारी योजना प्रभावीपणे राबविणारे, दिलेला शब्द पाळणारे आणि निर्णयक्षम राजकारणी अशी त्यांची प्रतिमा होती. राज्याच्या कोणत्याही कोपऱ्यातील कार्यकर्ता असो किंवा सामान्य नागरिक, प्रत्येकाच्या अडचणी जाणून त्या मार्गी लावण्याचा त्यांचा प्रयत्न नेहमीच दिसून येत असे.
या दुःखद पार्श्वभूमीवर कोरपना तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शोकसभा आयोजित करण्यात आली. यावेळी अजित दादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. शोकसभेत उपस्थित मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त करत अजित दादांच्या कार्याचा, त्यांच्या नेतृत्वाचा आणि राजकीय योगदानाचा आलेख शब्दांतून मांडला.
Related News
या श्रद्धांजली सभेस राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव आबिद अली, भाजपचे संजय मुसळे, किशोर बावने, अरुण मडावी, काँग्रेसचे विजय पिंपळ शेंडे, वहाब भाई, शेतकरी संघटनेचे अरुण नवले यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे धनराज जिवने, गोपाल मरापे, विनोद जुमडे, महादेव पेंदोर, रमेश डाखरे, शांताराम देरकर, विजय जिवने, सुहेल अली, मोहब्बत खान, शहेबाज अली, विकास टेकाम, सोनू शेख, प्रेमदास राठोड यांच्यासह शेकडो कार्यकर्ते व नागरिकांनी श्रद्धांजली अर्पण केली.
यावेळी बोलताना वक्त्यांनी सांगितले की, अजित दादा पवार हे केवळ राजकारणी नव्हते, तर ते प्रशासन, अर्थकारण, कृषी, सिंचन, उद्योग अशा राज्यातील प्रत्येक क्षेत्राचा सखोल अभ्यास असलेले लोकनेते होते. संकटाच्या काळात निर्णय घेण्याची त्यांची क्षमता आणि कार्यकर्त्यांप्रती असलेली आपुलकी सर्वश्रुत होती. त्यांच्या जाण्याने राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली असून ती भरून निघणे अशक्य असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
शोकसभेच्या शेवटी उपस्थितांनी दोन मिनिटांचे मौन पाळून दिवंगत नेत्यास श्रद्धांजली वाहिली. “अजित दादा अमर रहे” अशा घोषणा देत वातावरण भावूक झाले. अजित दादांचे विचार, कार्य आणि जनतेप्रती असलेली निष्ठा कायम स्मरणात राहील, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
