Air India चा ‘हवा-भटकंती’ घोळ! दिल्लीहून कॅनडाला जाणाऱ्या विमानाने 8 तास फिरून परत दिल्लीतच उतरले

Air India

Air India चा मोठा घोळ: दिल्लीहून कॅनडाला निघालेलं विमान 8 तास हवेत फिरून पुन्हा दिल्लीतच उतरलं

दिल्लीहून कॅनडाच्या व्हँकुव्हरसाठी उड्डाण केलेल्या एअर इंडियाच्या एआय 185 विमानाचा प्रवास प्रवाशांसाठी भयानक धक्का ठरला. विमानाने सकाळी 11:34 वाजता दिल्लीहून झेपावली आणि काही तासांत प्रवाशांचे स्वप्न होतं की ते कॅनडाच्या भूमीवर पोहचणार आहेत. मात्र 8 तासांच्या उड्डाणानंतर जेव्हा विमान जमिनीवर उतरतं, तेव्हा प्रवासी नेमकं ज्या विमानतळावरून निघाले होते, तिथेच परत आले.

नेमकं काय घडलं?

एअर इंडियाचे विमान दिल्लीहून उड्डाण करून चीनच्या हवाई हद्दीत पोहचले, जिथे कुनमिंगजवळ विमान प्रशासनाला लक्षात आले की, त्यांनी चुकीच्या विमानाचा वापर केला आहे. प्रवाशांना पाठवण्यासाठी निवडलेले बोईंग 777-200 एलआर विमान कॅनडाच्या नियमांनुसार त्या देशात प्रवेश करण्याची परवानगी नसल्याचे उघड झाले.

कॅनडात प्रवासासाठी एअर इंडियाला केवळ बोईंग 777-300 ईआर विमानाचा वापर करण्याची परवानगी आहे. प्रत्येक देशाच्या विमान वाहतुकीचे नियम वेगळे असून काही देशांमध्ये ठराविक प्रकारच्या विमानांना किंवा त्यांच्या टेल नंबरला प्रवेश दिला जातो. हा तांत्रिक घोळ लक्षात येताच विमानाला तातडीने दिल्लीला परत फिरण्याचे आदेश देण्यात आले.

8 तासांचा निरर्थक प्रवास

विमान तब्बल 7 तास 54 मिनिटे हवेत राहिले, पण शेवटी ज्या ठिकाणाहून उड्डाण केले होते, तिथेच परत आले. या चुकीमुळे एअर इंडियाला मोठा आर्थिक फटका बसला. बोईंग 777-200 सारखे विमान एका तासाला सुमारे 8 ते 9 टन इंधन जाळते. 8 तासांच्या या निष्फळ प्रवासामुळे झालेला इंधनाचा खर्च कोट्यवधी रुपयांच्या घरात आहे.

प्रवाशांची सोय आणि एअर इंडियाचे स्पष्टीकरण

घटनेनंतर एअर इंडियाने अधिकृत पत्रक काढून दिलगिरी व्यक्त केली आहे. ऑपरेशनल कारणांमुळे हा निर्णय घ्यावा लागल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रवाशांच्या गैरसोय टाळण्यासाठी त्यांना हॉटेलमध्ये राहण्याची सोय करण्यात आली आणि दुसऱ्या विमानाद्वारे त्यांना नियोजित स्थळी पाठवण्यात आले. विमानातील सर्व प्रवासी आणि कर्मचारी सुरक्षित आहेत.

नियोजनाचा प्रश्नचिन्ह

या घटनेमुळे एअर इंडियाच्या नियोजनावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. प्रवाशांना वेळ, पैसा, आणि मानसिक त्रास भोगावा लागला, तर एअर इंडियाला आर्थिक तोटा आणि प्रतिमेवर परिणाम भोगावा लागला. तांत्रिक चुका, विमान निवडीतील अपूर्ण तयारी, आणि नियोजनातील कमतरता यामुळे हा प्रकार घडला.

ही घटना प्रवाशांसाठी धक्कादायक ठरली असून विमान वाहतूक क्षेत्रातील नियामक अडचणींवर पुन्हा एकदा प्रकाश टाकते. भविष्यात अशा प्रकारच्या घोटाळ्यांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी एअर इंडियाला अधिक काटेकोर नियोजन, तांत्रिक तपासणी आणि योग्य विमानाची निवड याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

read also :  https://ajinkyabharat.com/fuel-price-premium-shot-industrial-diesel-flared-up/