राष्ट्रवादीचं मेगा प्लॅनिंग; सुनेत्रा पवारांचं रिलाँचिंग, ‘आपल्या वहिनी आहेत ना!’ कॅम्पेनची चर्चा
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आगामी काळातील राजकीय वाटचालीसाठी नव्या रणनीतीची आखणी सुरू असल्याची चर्चा आहे. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राजकीय भूमिकेला अधिक व्यापक स्वरूप देण्यासाठी विशेष कॅम्पेन राबवण्याची तयारी सुरू असल्याचे वृत्त समोर आले आहे. या कॅम्पेनमध्ये ‘आपल्या वहिनी आहेत ना!‘ हा संदेश केंद्रस्थानी ठेवला जाणार असल्याची माहिती राजकीय वर्तुळातून समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २७ सप्टेंबर रोजी नाशिक येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिवेशन होणार असून, याच अधिवेशनाच्या निमित्ताने सुनेत्रा पवार यांची नव्या राजकीय प्रतिमेसह मांडणी करण्याची तयारी सुरू असल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये त्यांचे दौरे, कार्यकर्ता संवाद आणि महिला-केंद्रित कार्यक्रम आयोजित करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अजित पवारांच्या निधनानंतर सुनेत्रा पवारांकडे पक्षाची धुरा
अजित पवार यांच्या विमान अपघाती निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेससमोर नेतृत्वाचा मोठा प्रश्न निर्माण झाला. त्यानंतर सुनेत्रा पवार यांच्यावर पक्षाची जबाबदारी आली. राजकारणात त्यांचा सक्रिय अनुभव तुलनेने मर्यादित असल्याने त्यांच्या नेतृत्वाबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली.
Related News
आता पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसोबतच सुनेत्रा पवार यांची स्वतंत्र राजकीय ओळख मजबूत करण्यावर भर दिला जात असल्याचे सांगितले जाते. ‘आपल्या वहिनी आहेत ना!’ हा भावनिक आणि कौटुंबिक संदर्भ असलेला संदेश त्यासाठी वापरण्याची रणनीती आखली जात असल्याची चर्चा आहे.
अजित पवार यांच्या काळात ‘एकच वादा, अजित दादा’ हा नारा राष्ट्रवादीच्या कार्यक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणात वापरला जात होता. सभा, बॅनर्स आणि पक्षाच्या प्रचार साहित्यामध्ये या घोषणेचा वापर करण्यात आला होता. आता नेतृत्वातील बदलानंतर नव्या घोषवाक्याच्या माध्यमातून कार्यकर्ते आणि मतदारांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो.
प्रशांत किशोर यांच्या रणनीतीची चर्चा
सुनेत्रा पवार यांच्या राजकीय पुनर्बांधणीच्या चर्चेत राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांचे नावही पुढे आले आहे. मे २०२६ मध्ये सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनी प्रशांत किशोर यांची भेट घेतली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेससाठी प्रशांत किशोर आणि त्यांची टीम रणनीतीकार म्हणून काम करणार असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते.
यानंतर ऑगस्ट २०२६ मध्ये प्रशांत किशोर यांनी मुंबईतील ‘देवगिरी’ निवासस्थानी सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांची पुन्हा भेट घेतल्याचे वृत्त आले. या बैठकीत पक्षाची पुढील रणनीती, आगामी राजकीय तयारी आणि जनमताचा आढावा यांसारख्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याचे विविध माध्यमांनी नमूद केले आहे. मात्र या बैठकीतील सर्व तपशील अधिकृतपणे सार्वजनिक करण्यात आलेले नाहीत.
‘गुलाबी कॅम्पेन’नंतर आता नवी राजकीय ब्रँडिंग?
अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीच्या प्रचारात २०२४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी ‘गुलाबी’ रंगाची थीम मोठ्या प्रमाणात चर्चेत आली होती. लाडकी बहीण योजनेच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गुलाबी जॅकेटमध्ये दिसू लागले. पक्षाच्या सभा, बॅनर्स, वाहनांपासून प्रचार साहित्यापर्यंत गुलाबी रंगाचा वापर करण्यात आला.
माध्यमांच्या वृत्तांनुसार, त्या काळातील या राजकीय ब्रँडिंगमध्ये डिझाईन बॉक्सचे नरेश अरोरा यांची भूमिका होती. मात्र २०२६ मध्ये राष्ट्रवादी आणि डिझाईन बॉक्स यांच्यातील कामकाज थांबल्याचे वृत्त आले. त्यानंतर पक्षाच्या नव्या राजकीय रणनीतीसाठी प्रशांत किशोर यांचे नाव पुढे आले.
त्यामुळे आता सुनेत्रा पवार यांच्यासाठी कोणती नवी प्रतिमा आणि प्रचार शैली तयार केली जाते, याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.
राज्यभर दौरे आणि महिला मतदारांवर भर?
‘आपल्या वहिनी आहेत ना!’ या संभाव्य कॅम्पेनचा केंद्रबिंदू सुनेत्रा पवार यांचा राज्यभरातील जनसंपर्क असू शकतो, अशी चर्चा आहे. महिलांशी संवाद, महिला कार्यकर्त्यांच्या बैठका, स्थानिक पातळीवरील पक्ष संघटन मजबूत करणे आणि विविध सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभाग वाढवणे, या माध्यमातून त्यांची प्रतिमा जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न होऊ शकतो.
महाराष्ट्रातील ग्रामीण भागात पक्षाचा संपर्क वाढवणे आणि महिला मतदारांशी थेट संवाद साधणे यावरही या रणनीतीत भर असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र या कॅम्पेनची अंतिम रूपरेषा, घोषवाक्याचा अधिकृत वापर आणि दौऱ्यांचे वेळापत्रक पक्षाकडून अधिकृतपणे जाहीर झालेले नाही.
राष्ट्रवादीतील अंतर्गत समीकरणांचाही परिणाम
एकीकडे सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची नव्याने बांधणी करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे, तर दुसरीकडे पक्षातील वरिष्ठ नेत्यांमधील अंतर्गत समीकरणांबाबतही राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
प्रशांत किशोर यांच्या भेटींनंतर राष्ट्रवादीच्या आगामी रणनीतीबाबत उत्सुकता वाढली आहे. विशेषतः पक्षाच्या नेतृत्वाची प्रतिमा, संघटनात्मक विस्तार आणि आगामी निवडणुकांसाठीची तयारी यामध्ये नव्या रणनीतीकाराची भूमिका किती असेल, याकडे लक्ष लागले आहे.
दरम्यान, सुनेत्रा पवार यांच्या राजकीय रिलाँचिंगचा अधिकृत कार्यक्रम आणि ‘आपल्या वहिनी आहेत ना!’ या कॅम्पेनची अंतिम घोषणा नाशिक अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
आता अजित पवार यांच्या राजकीय वारशाच्या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार स्वतःची स्वतंत्र राजकीय ओळख कशी निर्माण करतात, पक्ष संघटनेत कोणते बदल होतात आणि नव्या रणनीतीचा प्रत्यक्ष प्रचारात कसा वापर केला जातो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/disha-salian-5/
