अजितदादांच्या अपघातावर राजकारण करू नका; सुनेत्रा पवारांच्या वक्तव्यावर रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया
‘पुतण्या काकासाठी लढतोय’; सुप्रिया सुळेंच्या भूमिकेचं रोहित पवारांकडून समर्थन, CET सेलच्या कारभारावरही गंभीर आरोप
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या अपघाताच्या प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये राजकीय आरोप-प्रत्यारोपांना पुन्हा उधाण आले आहे. अजित पवार यांच्या अपघाताच्या प्रकरणात पोलिसांनी अद्याप गुन्हा दाखल न केल्याबद्दल खासदार सुप्रिया सुळे यांनी खंत व्यक्त केली होती. त्यावर सुनेत्रा पवार यांनी ‘अजितदादांच्या अपघातावरून राजकारण करू नका’, असा सल्ला दिला. आता या वादावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
रोहित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधताना सुनेत्रा पवार यांच्या वक्तव्याचा थेट संदर्भ देत आपली भूमिका स्पष्ट केली. ‘सुनेत्रा पवार यांनी जे विधान केले आहे, ते माझ्याबद्दल नव्हतं. मी त्याच परिवारात जन्माला आलोय, मी देखील पवार आहे. जे गेले, ते माझे काका आहेत. पुतण्या काकासाठी लढतोय,’ असं रोहित पवार यांनी म्हटलं.
अजित पवार यांच्या अपघाताची चौकशी योग्य पद्धतीने होणे आवश्यक असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. ‘त्यांचा अपघात झाला, त्याचा तपास योग्य पद्धतीने झाला पाहिजे, ही माझी मागणी आहे,’ असं ते म्हणाले. तसेच अजित पवार यांना आपले मित्र म्हणवणाऱ्या काही लोकांकडून त्यांच्या न्यायासाठी अपेक्षित भूमिका घेतली जात नसल्याची टीकाही त्यांनी केली.
Related News
‘जे स्वतःला दादाचे मित्र म्हणायचे, ते त्यांना न्याय मिळावा म्हणून लढत नाहीत. आमची मागणी जर कोणाला अयोग्य वाटत नसेल, तर ते त्यांना लखलाभ. मला जे वाटले ते मी बोलतो आणि करतो. मी तेच करणार. सुप्रियाताई योग्यच बोलल्या ना,’ असं म्हणत रोहित पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्या भूमिकेचं समर्थन केलं.
पवार कुटुंबातील राजकीय घडामोडींवरही भाष्य
दरम्यान, विक्रम काकडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन्ही गटांच्या संभाव्य विलीनीकरणाची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. या चर्चेबाबत विचारण्यात आलं असता रोहित पवार यांनी संबंधित चर्चांवर उपरोधिक भाष्य केलं.
‘त्यांना कन्स्ट्रक्शन सोडून वेगळं काही कळतं का? या लोकांसमोर पवारसाहेब राजकारणाशी संबंधित चर्चा करणार का? एवढी परिपक्वता आहे का?’ असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला.
त्यामुळे पवार कुटुंबातील राजकीय मतभेदांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये सुरू असलेल्या हालचालींकडे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
CET सेलच्या कारभारावर रोहित पवारांचे गंभीर आरोप
अजित पवारांच्या अपघाताच्या मुद्द्याबरोबरच रोहित पवार यांनी राज्यातील CET सेलच्या कारभारावरही गंभीर आरोप केले. CET सेलच्या विविध प्रश्नांबाबत आपण तीन वेळा अधिकाऱ्यांची भेट घेतल्याचं त्यांनी सांगितलं. शिंगारे सर तसेच काही पालक आपल्यासोबत असल्याचंही त्यांनी नमूद केलं.
CET परीक्षेशी संबंधित कामासाठी ‘एज्युस्पार्क’ नावाच्या कंपनीला देण्यात आलेल्या कंत्राटाबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. त्यांच्या म्हणण्यानुसार, यासंदर्भात अधिकाऱ्यांकडे वारंवार चर्चा करण्यात आली; मात्र समाधानकारक उत्तर मिळालं नसल्याचा आरोप त्यांनी केला.
रोहित पवार यांनी पुढे सांगितलं की, CET सेलच्या कामासाठी TCS कंपनीला कंत्राट मिळालं होतं. त्यांच्या म्हणण्यानुसार, तांत्रिक निविदेमध्ये चांगले गुण असूनही TCS ला कंत्राट देण्यात आलं नाही. तसेच ‘मेरिटेक’ नावाच्या कंपनीबाबतही त्यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले.
‘मेरिटेक कंपनीला काम देणार नाही, हे तावडे मंत्री असताना ठरलं होतं. तरीदेखील त्या कंपनीला कंत्राट दिलं आहे,’ असा आरोप रोहित पवार यांनी केला.
‘साडेचार लाख विद्यार्थ्यांचा डेटा लीक’
CET सेलच्या डेटाबाबतही रोहित पवार यांनी गंभीर दावा केला आहे. ‘CET सेलचा डेटा लीक झाला आहे. साडेचार लाख मुलांचा डेटा लीक झाला होता. शिंगारे सर यांनी तो डेटा देखील सेलला दिला आहे. CET सेलने देखील मान्य केलं की हा डेटा व्हायरल झाला आहे,’ असा दावा त्यांनी केला.
या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्याची मागणी करणार असल्याचंही रोहित पवार यांनी स्पष्ट केलं. ‘आम्ही आझाद मैदान पोलीस ठाण्यात जाणार आहोत. या संदर्भात गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार आहोत. पोलीस गरीब मुलांच्या बाजूने उभे राहतात का, हे पाहणार आहोत,’ असं ते म्हणाले.
CET सेलच्या कारभारावर टीका करताना त्यांनी या यंत्रणेवर ‘करप्शन, एक्स्प्लॉयटेशन आणि एक्सटॉर्शनचं केंद्र’ झाल्याचा आरोप केला. आपण करत असलेले आरोप हवेत करत नसून त्यामागे पुरावे असल्याचा दावाही त्यांनी केला.
एज्युस्पार्क कंपनीच्या व्यवहारांवरही प्रश्नचिन्ह
एज्युस्पार्क कंपनीशी संबंधित व्यक्ती आणि कंपन्यांच्या व्यवहारांवरही रोहित पवार यांनी प्रश्न उपस्थित केले. त्यांच्या आरोपानुसार, रुस्तम केरीवाला आणि अन्य दोन व्यक्ती एकमेकांच्या कंपन्यांमध्ये संचालक आहेत. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची गरज असल्याचं त्यांनी म्हटलं.
तसेच २०२१ मध्ये राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना संबंधित कंपनीला कंत्राट देण्यात आलं असेल, तर त्यावेळी निर्णय घेणाऱ्या नेत्यांवरही कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. २०२२-२३ मध्ये या कंपनीबाबत पुनरावलोकन झालं होतं, तरीही कंत्राट देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.
रोहित पवार यांनी तत्कालीन मंत्री उदय सामंत यांचं नाव घेत, २०२१ मध्ये संबंधित कंपनीला कंत्राट देण्यात आल्याचा दावा केला. तसेच धाराशिव जिल्ह्यातील एका गावातील काही विद्यार्थ्यांनी बंगळुरूला जाऊन एज्युस्पार्कसोबत व्यवहार केल्यानंतर चांगले पर्सेंटाइल मिळवल्याचा दावा करत, या बाबीचीही चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली.
दरम्यान, अजित पवार यांच्या अपघाताच्या तपासाच्या मागणीपासून ते CET सेलच्या कथित डेटा लीक आणि कंत्राट प्रक्रियेपर्यंत रोहित पवार यांनी सरकार आणि संबंधित यंत्रणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. त्यामुळे आगामी काळात या आरोपांवर सरकार, CET सेल तसेच संबंधित कंपन्यांकडून काय प्रतिक्रिया येते, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/navi-mumbai-news/
