सुनेत्रा वहिनींना मनसोक्त रडायलाही वेळ मिळाला नाही; ‘यांचं दादांवर खरंच प्रेम होतं का?’ बड्या नेत्याची पोस्ट चर्चेत
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या अंतर्गत राजकारण आणि नेतृत्वबदलाच्या चर्चांना उधाण आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष सुनेत्रा पवार आणि राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या भेटीनंतर पक्षाच्या पातळीवर विविध चर्चांना सुरुवात झाली आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हाध्यक्ष आणि प्रवक्ते उमेश पाटील यांनी सोशल मीडियावर केलेली एक पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या पोस्टमधून त्यांनी अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबाला पक्षातील काही लोकांकडून मानसिक त्रास होत असल्याचा दावा करत थेट सवाल उपस्थित केला आहे.
सुनेत्रा पवार आणि प्रशांत किशोर यांच्या भेटीची चर्चा
दोन दिवसांपूर्वी राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष सुनेत्रा पवार यांची भेट घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. या भेटीदरम्यान पक्षाच्या संघटनात्मक रचनेबाबत आणि प्रदेशाध्यक्षपदाबाबत चर्चा झाल्याचे दावे केले जात आहेत. पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदावर सध्या सुनील तटकरे आहेत.
दरम्यान, पक्षाच्या नेतृत्वात बदल करण्याबाबतही राजकीय चर्चांना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनीही प्रदेशाध्यक्ष बदलण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे. “दोन ते तीन वर्ष झाली आहेत. त्यामुळे आता प्रदेशाध्यक्ष बदलले पाहिजेत,” असं त्यांनी म्हटलं आहे.
Related News
नोकरीसाठी पोर्तुगालला गेली, तिथे जाताच विकून टाकलं; नागपूरच्या महिलेवर लैंगिक अत्याचाराचा आरोप
Gen Z नंतर आता Gen Alpha ची चिंता! 13 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया बंद? मोदी सरकार आणणार मोठं विधेयक
दिवसभर उत्साही राहायचंय? घरच्या घरी बनवा ‘हे’ 4 हाय प्रोटीन स्मूदी, शरीराला मिळेल भरपूर ऊर्जा
Mumbai Local : मुंबई लोकलमध्ये महिलेवर हात उचलला, बेल्ट काढून धमकावलं; आरोपीला अटक
GenZ शी बोलण्याआधी अमित शाहांचा राजीनामा घ्या; उद्धव ठाकरेंचा मोहन भागवतांना खोचक टोला
शिवसेना कोणाची? सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असतानाच उद्धव ठाकरेंचं जनतेला मोठं आवाहन
भारताचा चीनला मोठा दणका! अरुणाचलमधील 27 ठिकाणांची नावे अधिकृत, ड्रॅगनचा डाव उधळला
त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्यासमोर पक्षांतर्गत काही महत्त्वाचे निर्णय घेण्याचे आव्हान आहे का, याबाबतही चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर उमेश पाटील यांची पोस्ट अधिकच महत्त्वाची ठरत आहे.
उमेश पाटील यांच्या पोस्टमध्ये नेमकं काय?
उमेश पाटील यांनी आपल्या पोस्टमध्ये अजित पवार यांच्या समर्थक आणि कार्यकर्त्यांच्या भावनांचा उल्लेख केला आहे. अजितदादांवर निस्सीम प्रेम करणारे हजारो कार्यकर्ते आजही त्यांच्या कुटुंबासोबत उभे असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.
दादांनी कार्यकर्त्यांना काय दिलं, त्यांच्यावर किती प्रेम केलं आणि त्यांना कसं जपलं, याची जाणीव ठेवून त्यांच्या पश्चात “दादांचा परिवार हाच आपला परिवार” या भावनेने अनेक कार्यकर्ते निःस्वार्थपणे उभे असल्याचं उमेश पाटील यांनी म्हटलं आहे.
मात्र, याच पोस्टमध्ये त्यांनी काही लोकांवर अप्रत्यक्षपणे गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे. अजित पवार यांच्या नावावर, त्यांच्या विश्वासावर आणि त्यांनी दिलेल्या संधींवर मोठे झालेले काही लोक त्यांच्या कुटुंबाला मानसिक त्रास होईल, असं वातावरण निर्माण करत असतील तर त्यांच्या अजितदादांवरील प्रेमाबाबतच प्रश्न निर्माण होतो, असं पाटील यांनी म्हटलं आहे.
‘यांचं दादांवर खरंच प्रेम होतं का?’
उमेश पाटील यांच्या पोस्टमधील सर्वाधिक चर्चेत आलेला भाग म्हणजे त्यांनी उपस्थित केलेला थेट सवाल. अजित पवार सत्तेत असताना काही लोकांचं त्यांच्यावर प्रेम होतं का? आणि त्यांच्या निधनानंतर हे प्रेम कमी कसं होऊ शकतं? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
“दादांवरचं प्रेम खरं होतं, तर दादांच्या माघारी त्यांच्या परिवारावरचं प्रेम कमी कसं होऊ शकतं?” असा सवाल पाटील यांनी केला आहे.
त्यांनी पुढे म्हटलं आहे की, अजित पवार यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबासोबत अधिक संवेदनशीलतेने उभं राहण्याची गरज होती. ज्यांचं अजितदादांवर खरं प्रेम होतं, त्यांनी त्यांच्या परिवारावर तेवढंच नव्हे तर कणभर जास्त प्रेम करायला हवं होतं, अशी आपली धारणा असल्याचं पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.
‘सुनेत्रा वहिनींना मनसोक्त रडायलाही वेळ मिळाला नाही’
उमेश पाटील यांनी आपल्या पोस्टमध्ये सुनेत्रा पवार यांच्या परिस्थितीचाही भावनिक उल्लेख केला आहे. अजित पवार यांच्या अचानक निधनानंतर त्यांच्या कुटुंबाचं संपूर्ण आयुष्य एका क्षणात बदललं. कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या आयुष्याला अचानक वेगळं वळण मिळालं, असं त्यांनी म्हटलं आहे.
विशेषतः सुनेत्रा पवार यांना स्वतःच्या दुःखातून सावरण्यासाठीही पुरेसा वेळ मिळाला नसल्याचं पाटील यांनी नमूद केलं आहे.
“सुनेत्रा वहिनींना तर स्वतःच्या दुःखात काही काळ शांत बसण्याचीही उसंत मिळाली नाही. मनसोक्त रडायलाही वेळ मिळाला नाही… अश्रू पुसण्याआधीच पक्षाची आणि सरकारची प्रचंड जबाबदारी खांद्यावर घ्यावी लागली,” अशा आशयाची भावना त्यांनी व्यक्त केली आहे.
त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्यावर आलेल्या राजकीय आणि संघटनात्मक जबाबदाऱ्यांच्या पार्श्वभूमीवर पक्षातील सहकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी त्यांच्या पाठीशी उभं राहण्याची गरज असल्याचं त्यांच्या पोस्टमधून अधोरेखित होत आहे.
राष्ट्रवादीतील अंतर्गत मतभेद पुन्हा चर्चेत
उमेश पाटील यांच्या पोस्टमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत मतभेदांचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. त्यांच्या पोस्टमध्ये कोणाचंही नाव स्पष्टपणे घेण्यात आलेलं नसले तरी “दादांच्या नावावर, विश्वासावर आणि संधींवर मोठे झालेले काही लोक” या उल्लेखामुळे राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क सुरू झाले आहेत.
दरम्यान, सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाची भूमिका, प्रदेशाध्यक्ष बदलाची चर्चा आणि पक्षातील संघटनात्मक फेरबदल या सर्व मुद्द्यांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील वातावरण आगामी काळात आणखी तापण्याची शक्यता आहे.
उमेश पाटील यांच्या या पोस्टवर पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांकडून काय प्रतिक्रिया येतात, तसेच सुनेत्रा पवार या पक्षांतर्गत घडामोडींवर कोणती भूमिका घेतात, याकडे आता राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
