MPSC टॉपर अधिकारी 45 लाखांच्या लाच प्रकरणात अटकेत; सुनेत्रा पवारांच्या बैठकीनंतर काही तासांतच ACBची कारवाई
बीडमध्ये सामाजिक वनीकरण विभागाच्या अधिकाऱ्यावर लाचखोरीचा आरोप; राहत्या घरातून 45 लाखांची रोकड जप्त
बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक लाचखोरीचे प्रकरण समोर आले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या एका अधिकाऱ्याला 45 लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले आहे. सामाजिक वनीकरण विभागातील अधिकारी श्रीनिवास लखमावाड यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, लाच स्वीकारण्यापूर्वी काही तास आधीच लखमावाड हे बीडच्या पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला उपस्थित होते. त्यामुळे या प्रकरणाची चर्चा राजकीय वर्तुळातही रंगली आहे.
45 लाखांच्या लाचेचा सापळा कसा रचला?
मिळालेल्या माहितीनुसार, बीड जिल्ह्यातील सामाजिक वनीकरण विभागाचे अधिकारी श्रीनिवास लखमावाड यांनी एका वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याकडे तब्बल 45 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.
Related News
शिवसेना चिन्हाच्या सुनावणीत शिंदे गटाचा ‘हुकूमी एक्का’; नीरज कौल यांनी थेट कार्यकर्त्यांच्या भावनेला घातला हात
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का? ‘पक्षप्रमुख’ पदावर शिंदे गटाचा मोठा दावा; सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
2008 सारख्या आर्थिक संकटाची चाहूल? अमेरिकेतील ‘हा’ बदल भारतासाठी ठरणार धोक्याची घंटा
उपवासाला चहा प्यावा की कॉफी? जाणून घ्या शरीरासाठी कोणता पर्याय ठरतो फायदेशीर
17 खासदारांना भाजपचा मोठा झटका; पक्षप्रवेशाच्या चर्चेला पूर्णविराम, दिल्लीत खळबळ
PF खात्यातून कर्ज मिळते का? EPFO चा नियम काय सांगतो, जाणून घ्या संपूर्ण माहिती
खात्यात अचानक पैसे आले? RBIचा मोठा निर्णय; संशयास्पद व्यवहारांवर लागणार ‘डेबिट होल्ड’
Manoj Jarange Patilचा तिसऱ्यांदा अर्ज; मुंबई पोलिसांकडून परवानगी मिळणार का? मोठी अपडेट समोर
Manoj Jarange Patil मुंबईकडे रवाना; पहिला मुक्काम पाटोदा, सरकारच्या भूमिकेकडे लक्ष
Disha Salian प्रकरणात पुन्हा ट्विस्ट; ठाकरे कुटुंबाला डाग कोणी लावला? भाजप नेत्याचा राऊतांना पलटवार
साखरेच्या दरात मोठी अपडेट! 4 दिवसांत भाव घसरले, महाराष्ट्रात साखर कितीला?
PF चा लेखाजोखा आता WhatsApp वर! EPFO आणणार नवी सुविधा, घरबसल्या मिळणार सर्व माहिती
सरकारकडून 2025-26 या आर्थिक वर्षासाठी बीड जिल्ह्यात वृक्ष लागवडीसाठी सुमारे 3 कोटी 75 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. या निधीच्या वितरणासाठी तसेच संबंधित अधिकाऱ्याची प्रलंबित वेतनवाढ मंजूर करण्यासाठी लखमावाड यांनी 12 टक्के कमिशनची मागणी केल्याचा आरोप आहे.
मात्र संबंधित अधिकाऱ्याने लाच देण्यास नकार दिला. त्यानंतर लखमावाड यांनी सूडबुद्धीने त्यांची वेतनवाढ रोखली आणि निलंबनाचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवण्याची कारवाई केल्याचे सांगितले जात आहे.
यामुळे त्रस्त झालेल्या संबंधित अधिकाऱ्याने अखेर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.
ACBने रचला सापळा; घरातून रोख रकमेसह अटक
तक्रार मिळाल्यानंतर एसीबीच्या अधिकाऱ्यांनी संपूर्ण प्रकरणाची पडताळणी केली. लाच मागितल्याची खात्री झाल्यानंतर बीडमधील लखमावाड यांच्या राहत्या घरात सापळा रचण्यात आला.
तक्रारदाराला लाचेची रक्कम घेऊन घरी बोलावण्यात आले होते. ठरल्याप्रमाणे तक्रारदाराने पैसे देताना तोंडावरून हातरुमाल फिरवत घाम पुसण्याचा इशारा केला. हा संकेत मिळताच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने घरावर धाड टाकली.
या कारवाईत श्रीनिवास लखमावाड यांना 45 लाख रुपयांच्या रोख रकमेसह ताब्यात घेण्यात आले.
एसीबीचे डीवायएसपी हनुमंत शिंदे आणि पोलीस निरीक्षक भास्कर नवले यांच्या पथकाने ही कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे.
सुनेत्रा पवारांच्या बैठकीला उपस्थिती, त्यानंतर लाच प्रकरणामुळे खळबळ
या प्रकरणातील सर्वात चर्चेचा मुद्दा म्हणजे लखमावाड यांची कारवाईच्या काही तास आधी झालेली सरकारी बैठकीतील उपस्थिती.
बीडच्या जिल्हा नियोजन समितीची बैठक उपमुख्यमंत्री आणि बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली होती. या बैठकीला सामाजिक वनीकरण विभागाचे अधिकारी श्रीनिवास लखमावाड उपस्थित होते.
बैठकीनंतर काही वेळातच त्यांनी आपल्या घरी जाऊन 45 लाख रुपयांची लाच स्वीकारल्याचा आरोप आहे. त्यामुळे एका वरिष्ठ अधिकाऱ्यावर झालेल्या या कारवाईमुळे प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.
MPSC परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक, पण आता लाचखोरीचा आरोप
श्रीनिवास लखमावाड यांची शैक्षणिक पार्श्वभूमीही चर्चेत आली आहे. ते मूळचे नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यातील रत्नाळी गावचे रहिवासी आहेत.
नांदेडमध्ये प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली.
2016 मध्ये झालेल्या MPSC परीक्षेत त्यांनी अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातून राज्यात प्रथम क्रमांक मिळवला होता. गुणवत्तेच्या जोरावर सरकारी सेवेत दाखल झालेल्या या अधिकाऱ्यावर आता लाचखोरीचा गंभीर आरोप झाल्याने अनेकांना धक्का बसला आहे.
दीड लाख रुपये पगार असताना 45 लाखांची मागणी
लखमावाड यांचा महिन्याचा पगार सुमारे दीड लाख रुपये असल्याची माहिती आहे. मात्र, त्यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करत तब्बल 45 लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप एसीबीच्या कारवाईतून समोर आला आहे.
एवढ्या मोठ्या रकमेची लाच मागितल्यामुळे प्रशासनातील भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
पुढील तपास सुरू
या प्रकरणात एसीबीकडून पुढील तपास सुरू आहे. लखमावाड यांनी लाचेची मागणी का केली, या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, तसेच निधी वितरण प्रक्रियेत काही गैरप्रकार झाले आहेत का, याचा तपास केला जात आहे.
MPSCसारख्या स्पर्धा परीक्षेत यश मिळवून सरकारी सेवेत दाखल झालेल्या अधिकाऱ्यावर लाचखोरीचा आरोप झाल्याने बीडसह संपूर्ण महाराष्ट्रात या प्रकरणाची चर्चा होत आहे.
