मूर्तिजापूर : MPSC परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्याच्या निर्णयाला विरोध करत मूर्तिजापुरातील स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी तीव्र आंदोलन केले. ऑनलाइन परीक्षेमुळे लागू होणाऱ्या नॉर्मलायझेशन पद्धतीमुळे गुणवंत विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला.
विद्यार्थ्यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी तसेच आमदार हरीश पिंपळे यांना निवेदन देत MPSC परीक्षा पूर्वीप्रमाणे ऑफलाइन OMR पद्धतीने घेण्याची मागणी करण्यात आली. यावेळी विद्यार्थी प्रतिनिधी अक्षय सरदार यांनी विद्यार्थ्यांच्या भावना व्यक्त करत ऑनलाइन परीक्षा पद्धतीमुळे हजारो विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याचा दावा केला.
यावेळी त्यांनी माध्यमांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले. लाखो विद्यार्थ्यांचे आंदोलन आणि त्यांचे प्रश्न प्रसारमाध्यमांमध्ये पुरेशा प्रमाणात का दाखवले जात नाहीत असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
विद्यार्थ्यांनी राज्य सरकार आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा प्रक्रिया पारदर्शक ठेवून सर्वांना समान संधी मिळेल अशा ऑफलाइन OMR पद्धतीचा अवलंब करावा अशी मागणी केली. मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही विद्यार्थ्यांनी दिला.
