आषाढी एकादशी 2026: संत निवृत्तिनाथ पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान; भक्तीचा महासागर, मात्र व्हीआयपी गर्दीने व्यवस्थेची परीक्षा
‘वारी चुकायची नाही’ हा वारकऱ्यांचा अढळ संकल्प पुन्हा एकदा साकार झाला. कपाळी गंध-बुक्का, डोईवर तुळशीचे वृंदावन, गळ्यात तुळशीमाळ, हाती टाळ-मृदंग आणि मुखी अखंड “ज्ञानोबा-तुकोबा” तसेच “निवृत्तिराया-पांडुरंग”चा जयघोष करत हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत संत निवृत्तिनाथ महाराजांच्या पालखीने त्र्यंबकेश्वरातून पंढरपूरकडे प्रस्थान केले. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेला हा सोहळा भक्तिभाव, परंपरा आणि उत्साहाने ओतप्रोत भरलेला होता. मात्र, पावसामुळे झालेला चिखल, बदललेला मार्ग आणि व्हीआयपी वाहनांच्या गर्दीमुळे काही काळ व्यवस्थेची मोठी परीक्षा पाहायला मिळाली.
सोमवारी सकाळपासूनच संत निवृत्तिनाथ संजीवन समाधी मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले वारकरी मंदिर परिसरात दाखल झाले होते. दिंड्या, भगव्या पताका, टाळ-मृदंगाचा गजर आणि अभंगांच्या स्वरांनी त्र्यंबकेश्वर नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली.
Related News
दुपारी सुमारे बारा वाजण्याच्या सुमारास पालखी प्रस्थानापूर्वी पारंपरिक नारळ प्रसादाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी अनेक मानकरी, संत परंपरेतील प्रतिनिधी, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. धार्मिक विधी पूर्ण झाल्यानंतर पालखी प्रस्थानासाठी अंतिम तयारी करण्यात आली.
आषाढी एकादशी : दुपारी अडीच वाजता भक्तीचा अविस्मरणीय क्षण
दुपारी सुमारे अडीचच्या सुमारास संत निवृत्तिनाथ महाराजांच्या पालखीने संजीवन समाधी मंदिरातून पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण सुरू केले. सजवलेले अश्व, भगव्या पताका, नगाऱ्यांचा गजर, पारंपरिक वाद्ये आणि “ज्ञानोबा-तुकोबा”, “जय जय राम कृष्ण हरी”च्या अखंड घोषणांनी वातावरण भारावून गेले.
रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या नागरिकांनी पालखीवर पुष्पवृष्टी केली. अनेक महिलांनी आकर्षक रांगोळ्या काढून पालखीचे स्वागत केले. घरांच्या गच्च्यांवरून फुलांची उधळण करण्यात आली. वारकरी भक्तांनी अभंग, भारुडे आणि फुगड्यांमधून भक्तीचा अनोखा आविष्कार सादर केला.
बदललेल्या मार्गामुळे भाविकांची कसरत
यंदाच्या पालखी सोहळ्यात एक महत्त्वाचा बदल पाहायला मिळाला. सिंहस्थ विकासकामांमुळे त्र्यंबकेश्वरातील अनेक रस्त्यांवर खोदकाम सुरू असल्याने पालखीचा पारंपरिक मार्ग बदलण्यात आला.
नवीन मार्गाची माहिती अनेक भाविकांना नसल्याने मंदिराकडे जाताना तसेच परतताना त्यांना खोदलेल्या रस्त्यांमधून मार्ग काढावा लागला. प्रशासनाने काही ठिकाणी खोदकाम बुजवले असले तरी सकाळच्या पावसामुळे सर्वत्र चिखल झाला होता. त्यामुळे वृद्ध वारकरी, महिला आणि लहान मुलांसाठी चालणे काहीसे कठीण झाले.
चौकीमाथा आणि तेलीगल्लीत प्रथमच पालखी
आषाढी एकादशी : मार्ग बदलल्यामुळे यंदा पालखी प्रथमच चौकीमाथा आणि तेलीगल्ली परिसरातून गेली. त्यामुळे या भागातील नागरिकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. रस्त्यांवर स्वागत कमानी उभारण्यात आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीने आरती करून पालखीचे स्वागत करण्यात आले.स्थानिक नागरिकांनी हा ऐतिहासिक क्षण म्हणून आनंद व्यक्त केला. अनेकांनी मोबाईलमध्ये या सोहळ्याचे चित्रीकरण केले.
कुशावर्त तीर्थावर महापूजा
पालखीने पुढे कुशावर्त तीर्थ येथे आगमन केले. येथे संत निवृत्तिनाथ महाराजांच्या पादुकांची महापूजा करण्यात आली. आरतीनंतर पालखी त्र्यंबकेश्वर मंदिराकडे रवाना झाली.त्र्यंबकेश्वर मंदिरात मंदिर विश्वस्तांनी पालखीचे पारंपरिक स्वागत केले. संत निवृत्तिनाथ महाराज आणि भगवान त्र्यंबकराज यांची प्रतीकात्मक भेट पार पडली. या वेळी उपस्थित वारकरी भक्तांनी अभंग सेवा सादर केली. टाळ-मृदंगाच्या साथीने भक्तीचा रंग अधिकच खुलला.
पहिला मुक्काम गहिनीनाथ महाराज समाधीस्थळी
आषाढी एकादशी : त्र्यंबकेश्वरातून प्रस्थान केल्यानंतर पालखीचा पहिला मुक्काम प्रस्थान स्थळापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या पेगलवाडी फाटा येथील महानिर्वाणी आखाड्यातील गहिनीनाथ महाराज समाधीस्थळी ठेवण्यात आला. येथे हजारो वारकऱ्यांसाठी निवास, भोजन आणि इतर सुविधांची व्यवस्था करण्यात आली.
व्हीआयपी वाहनांमुळे विस्कळीत झाले नियोजन
पालखी सोहळ्यासाठी मंदिर परिसरात वाहनबंदी लागू करण्यात आली होती. सामान्य भाविकांना वाहनांसह प्रवेश नाकारण्यात आला होता. मात्र, विविध मान्यवरांच्या वाहनांच्या ताफ्यामुळे संपूर्ण परिसरात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली.
साधू-महंतांच्या वाहनांसह मंत्री, लोकप्रतिनिधी आणि राजकीय पदाधिकाऱ्यांच्या वाहनांची मोठी गर्दी झाल्याने पायी चालणाऱ्या वारकऱ्यांना मार्ग काढणे कठीण झाले. अनेक ठिकाणी काही काळ पालखीचा वेगही मंदावला.भाविकांनी अशा धार्मिक सोहळ्यांमध्ये व्हीआयपी संस्कृतीपेक्षा वारकऱ्यांच्या सोयींना प्राधान्य द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
प्रशासनाचे उशिरा आवाहन
प्रशासनाने २९ आणि ३० जून रोजी खासगी वाहनांचा वापर टाळून सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याचे आवाहन केले. मात्र, हे आवाहन पालखी प्रस्थानाच्या अवघ्या काही तासांपूर्वी करण्यात आल्याने त्याचा अपेक्षित परिणाम दिसून आला नाही.स्थानिक नागरिकांनी हे आवाहन किमान दोन-तीन दिवस आधी झाले असते तर वाहतूक कोंडी टाळता आली असती, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
भक्तीचा उत्साह कायम
आषाढी एकादशी : अनेक अडचणी असूनही वारकऱ्यांच्या उत्साहात कोणतीही कमी दिसून आली नाही. पावसात भिजत, चिखलातून चालत, टाळ-मृदंगाच्या तालावर अभंग गात हजारो वारकरी पुढील प्रवासाला निघाले. “वारी म्हणजे भक्ती, समर्पण आणि संत परंपरेचा उत्सव” असल्याचे चित्र पुन्हा एकदा पाहायला मिळाले.
संत निवृत्तिनाथ महाराजांची पालखी आता विविध मुक्कामांमधून मार्गक्रमण करत आषाढी एकादशीपूर्वी पंढरपूरमध्ये दाखल होणार आहे. या पालखी सोहळ्याकडे राज्यभरातील वारकरी आणि भाविकांचे लक्ष लागले आहे.
