महायुतीतील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा समोर आले असून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी अर्थखात्याच्या मुद्द्यावरून नाराजी व्यक्त केली आहे. शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तार यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना मिटकरी यांनी महायुतीत मोठा-लहान भाऊ हा मुद्दा महत्त्वाचा असला तरी वैचारिक प्रगल्भता आणि विचारधारेलाही तितकेच महत्त्व असल्याचे सांगितले.
संख्याबळाच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीतील ‘लहान भाऊ’ असल्याचे मान्य करताना त्यांनी, “घरात लहान भाऊही तितकाच महत्त्वाचा असतो जितका मोठा भाऊ असतो,” असे स्पष्ट केले. अब्दुल सत्तार हे माजी मंत्री असूनही पुत्रप्रेमापोटी महायुतीच्या धर्माला न शोभणारी विधाने करत असल्याचा टोला त्यांनी लगावला.
मिटकरी म्हणाले की, २०२९ च्या विधानसभा निवडणुकीस अजून वेळ असून तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस बरोबरीचा किंवा मोठा भाऊ ठरू शकतो, हे जनतेसमोर सिद्ध होईल. त्यांनी अर्थखात्याच्या वाटपावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अजित पवार महायुतीत सहभागी झाले तेव्हा ते उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. सध्या सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री असल्या तरी अर्थखात्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
Related News
अजित पवारांच्या अस्थींचे काटेपूर्णा प्रकल्पात भावनिक विसर्जन
मोठा खुलासा? अजित पवार विमान अपघातावर 7 गंभीर शंका; शिंदे गटाची प्रतिक्रिया चर्चेत
अकोट नगराध्यक्ष निवडणूक: राजकीय समीकरणांमुळे शहरात उत्सुकतेचे वातावरण
राष्ट्रवादी काँग्रेसचा अर्थखात्यावर अधिकार असतानाही ते खाते अद्याप भाजपकडेच असल्याची खंत व्यक्त करत मिटकरी यांनी ही बाब पक्षासाठी वेदनादायी असल्याचे म्हटले. महायुती स्थापनेवेळी झालेल्या करारानुसार राष्ट्रवादी काँग्रेसला अर्थखाते तातडीने परत द्यावे आणि दिलेला शब्द पाळावा, अशी आग्रही मागणी त्यांनी केली.
