मुंबई :
राज्याचे वरिष्ठ आयपीएस अधिकारी संजय वर्मा हे राज्याचे नवे पोलिस महासंचालक असणार आहेत. सोमवार, ४ नोव्हेंबर रोजी निवडणूक आयोगाने रश्मी शुक्ला यांना पदावरून हटवले होते. त्यानंतर मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्यावर पोलिस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला होता. त्यानंतर आज संजय वर्मा यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली करण्यात आली. काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी तक्रार केल्यानंतर निवडणूक आयोगाने रश्मी शुक्ला यांची बदली करण्याचे आदेश दिले. मुख्य सचिवांना आदेश दिल्यानंतर त्यांचा पदभार राज्यातील वरिष्ठ आयपीएस अधिका-याकडे सोपवण्यात आला होता. संजय वर्मा हे राज्याच्या कायदेशीर आणि तांत्रिक विभागाचे महासंचालक राहिले आहेत. वर्मा हे १९९० च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. संजय वर्मा हे २०२८ मध्ये निवृत्त होणार आहेत. वर्मा यांच्या नावाची कालपासून चर्चा होती. राज्यात सर्वांत वरिष्ठ अधिका-यांमध्ये रितेश कुमार, विवेक फणसाळकर आणि संजय वर्मा यांची नावे पोलिस महासंचालकपदासाठी आघाडीवर होती. अखेर संजय वर्मा यांची राज्याच्या पोलिस महासंचालकपदी निवड झाली.