हडपसरमध्ये मृत्यूचं तांडव! विषारी दारू प्रकरणात मोठा खुलासा
पुण्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि भीतीदायक घटना समोर आली आहे. हडपसर परिसरात विषारी दारूच्या सेवनामुळे पाच जणांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण शहर हादरलं आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये काही दिवसांपूर्वी घडलेल्या अशाच प्रकारच्या घटनेनंतर आता पुण्यातही जीवघेण्या गावठी दारूने बळी घेतल्याचं समोर आल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या प्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाने योगेश वानखेडे या संशयित आरोपीला अटक केली असून, त्याच्याकडून सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे.
या मृत्यूंच्या मालिकेमुळे पोलिस आणि प्रशासन सतर्क झाले. तपासादरम्यान सर्व मृत व्यक्तींनी एकाच प्रकारच्या गावठी दारूचे सेवन केल्याची माहिती समोर आली. यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने तपासाची सूत्रे हाती घेतली आणि या प्रकरणामागे केमिकलयुक्त स्पिरिटपासून तयार करण्यात आलेली विषारी दारू असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला.
Related News
या प्रकरणात योगेश वानखेडे या व्यक्तीचे नाव समोर आले आहे. त्यानेच पिंपरी-चिंचवड आणि पुणे परिसरात स्पिरिट पोहोचवल्याची माहिती तपासात उघड झाली आहे. विशेष म्हणजे मृत्यूच्या घटना समोर आल्यानंतर योगेश वानखेडे स्वतः अधिकाऱ्यांसमोर हजर झाला. त्यानंतर त्याला तात्काळ अटक करण्यात आली. सध्या त्याच्याकडून चौकशी सुरू असून या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही तपास केला जात आहे.
दरम्यान, या घटनेमुळे हडपसर परिसरात भीती आणि संतापाचं वातावरण आहे. मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून नागरिकांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. अनेक सामाजिक संघटनांनीही बेकायदेशीर दारू विक्रीविरोधात कठोर पावलं उचलण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.
मृत व्यक्तींची ओळख पुढीलप्रमाणे झाली आहे:
- राहुल शरद क्षीरसागर (वय 45, रा. हडपसर, पुणे)
- विजय भू कुरलाल शर्मा (वय 45, रा. हडपसर, पुणे)
- अरुण डाडर (रा. हडपसर)
- अशोक रमेश चव्हाण (रा. काळेपडळ)
याशिवाय आणखी एका मृत व्यक्तीची माहिती पोलिसांकडून गोळा करण्यात येत आहे.
पोलिसांनी सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी ताब्यात घेतले असून पोस्टमॉर्टम अहवालानंतर मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होणार आहे. मात्र प्राथमिक तपासात विषारी दारूमुळेच मृत्यू झाल्याचा संशय अधिक बळावला आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभाग, पुणे पोलीस आणि आरोग्य विभाग संयुक्तपणे या प्रकरणाचा तपास करत आहेत. संबंधित भागात बेकायदेशीर दारू विक्री करणाऱ्यांवर धाडी टाकण्याची मोहीमही सुरू करण्यात आली आहे. याशिवाय नागरिकांनी कोणतीही संशयास्पद दारू खरेदी किंवा सेवन करू नये, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
पिंपरी-चिंचवड आणि पुण्यात सलग घडलेल्या या घटनांमुळे महाराष्ट्रातील बेकायदेशीर दारू व्यवसाय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. स्वस्त दरात मिळणाऱ्या गावठी दारूमध्ये केमिकलयुक्त पदार्थ मिसळून ती विकली जात असल्याने अनेकांचे जीव धोक्यात येत आहेत. अशा प्रकारच्या घटनांमुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.
सध्या संपूर्ण पुणे शहराचे लक्ष या प्रकरणाकडे लागले असून, तपासातून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
