अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर समोर आलेल्या दाव्याने देश हादरला
Air India Crash : शेवटच्या क्षणापर्यंत झुंज! कॅप्टन सभरवालांच्या हातात कंट्रोल हँडल; धक्कादायक खुलासा
नवी दिल्ली : गेल्या वर्षी घडलेल्या एअर इंडियाच्या भीषण AI-171 विमान दुर्घटनेबाबत आता एक अत्यंत धक्कादायक आणि भावनिक दावा समोर आला आहे. अहमदाबादहून लंडनकडे निघालेल्या बोईंग 787 ड्रीमलाइनर विमानाच्या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेले मुख्य वैमानिक कॅप्टन सुमित सभरवाल यांनी शेवटच्या क्षणापर्यंत विमान वाचवण्याचा प्रयत्न केला असावा, असा दावा शवागृहात उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने केला आहे. या व्यक्तीच्या मते, सभरवाल यांच्या मृतदेहाच्या हातात विमानाचे कंट्रोल हँडल अर्थात ‘योक’ घट्ट पकडलेले होते.
१२ जून २०२५ रोजी घडलेल्या या भीषण दुर्घटनेत एकूण २६० जणांचा मृत्यू झाला होता. त्यामध्ये विमानातील २४१ प्रवासी व कर्मचारी आणि जमिनीवरील १९ जणांचा समावेश होता. या अपघातातून केवळ एकच प्रवासी जीवंत बचावला होता. या दुर्घटनेने संपूर्ण देश हादरला होता आणि आजही त्या घटनेच्या आठवणी लोकांच्या मनातून पुसल्या गेलेल्या नाहीत.
Related News
शवागृहात दिसलेलं ‘नरकासारखं’ दृश्य
या दुर्घटनेत आपले नातेवाईक गमावलेले रोमिन वोहरा यांनी ब्रिटिश माध्यम ‘डेली मेल’शी बोलताना काही धक्कादायक अनुभव सांगितले. कोविड काळात अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पॅथॉलॉजी लॅब असिस्टंट म्हणून काम केले असल्यामुळे त्यांना शवागृहात प्रवेश मिळाला होता. ते आपल्या नातेवाईकांचे मृतदेह ओळखण्यासाठी तिथे गेले होते.
वोहरा यांनी सांगितले की, शवागृहातील दृश्य अत्यंत भीषण होते. अनेक मृतदेह जमिनीवर ठेवलेले होते. कुठे तुटलेले अवयव, तर कुठे जळालेली शरीरं दिसत होती. एका आईचा मृतदेह आपल्या लहान बाळाला कुशीत धरलेल्या अवस्थेत असल्याचे त्यांनी सांगितले. काही मृतदेह इतके विद्रूप झाले होते की ओळख पटवणंही अशक्य होतं.
त्यांच्या म्हणण्यानुसार, “मी आयुष्यात असं दृश्य कधीच पाहिलं नव्हतं. ते दृश्य थेट नरकातून आल्यासारखं होतं.”
सभरवाल यांचा मृतदेह वेगळा ठेवण्यात आला होता
या सगळ्या भीषण दृश्यांमध्ये एक गोष्ट मात्र वोहरा यांच्या लक्षात ठळकपणे राहिली. त्यांनी दावा केला की, कॅप्टन सुमित सभरवाल यांचा मृतदेह इतरांपासून वेगळ्या कोपऱ्यात ठेवण्यात आला होता.
त्यांच्या मते, सभरवाल यांचा मृतदेह बसलेल्या अवस्थेत होता. त्यांच्या शरीराचा मागील भाग जळालेला होता, मात्र पुढील भाग तुलनेने सुरक्षित दिसत होता. विशेष म्हणजे त्यांचा पांढरा पायलट गणवेश, खांद्यावरील चार सोनेरी पट्टे, टाय आणि बूटही व्यवस्थित अवस्थेत होते.
मात्र सर्वात धक्कादायक बाब म्हणजे त्यांच्या हातात विमान नियंत्रित करण्यासाठी वापरले जाणारे ‘योक’ घट्ट पकडलेले होते. हे हँडल अपघाताच्या वेळी तुटून वेगळे झाले असावे, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
शेवटच्या सेकंदापर्यंत विमान वाचवण्याचा प्रयत्न?
एव्हिएशन क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, हा दावा खरा असल्यास कॅप्टन सभरवाल यांनी शेवटच्या क्षणापर्यंत विमान नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न केला असावा. विमान कोसळत असतानाही त्यांनी नियंत्रण सोडले नाही, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
वैमानिकांसाठी शेवटच्या क्षणापर्यंत प्रवाशांचे प्राण वाचवण्याचा प्रयत्न करणे ही केवळ जबाबदारी नसून एक शपथ असते. त्यामुळे सभरवाल यांच्या या कथित अवस्थेमुळे देशभरातून भावनिक प्रतिक्रिया उमटत आहेत.सोशल मीडियावर अनेकांनी त्यांना “खरे हिरो” असे संबोधले आहे. काहींनी त्यांची तुलना युद्धातील सैनिकांशी केली आहे.
नेमकं काय घडलं होतं?
१२ जून २०२५ रोजी एअर इंडियाचे AI-171 हे बोईंग 787 ड्रीमलाइनर विमान अहमदाबादहून लंडनकडे रवाना झाले होते. उड्डाणानंतर अवघ्या काही सेकंदांत विमानाने नियंत्रण गमावले आणि ते अहमदाबादमधील बी.जे. मेडिकल कॉलेजच्या वसतिगृह इमारतीवर कोसळले.या भीषण स्फोटामुळे परिसरात आगीचे मोठे लोळ उठले. अनेक विद्यार्थी आणि स्थानिक नागरिक यामध्ये सापडले. दुर्घटनेनंतर बचावकार्य अनेक तास सुरू होते.
प्राथमिक तपासात पायलटवर संशय
अपघातानंतर जुलै २०२५ मध्ये समोर आलेल्या प्राथमिक तपास अहवालात धक्कादायक बाबी समोर आल्या होत्या. विमान अपघात तपास प्राधिकरणाच्या मते, उड्डाणानंतर काही सेकंदांतच दोन्ही इंजिनांचा इंधन पुरवठा खंडित झाला होता.
कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरमध्ये एका पायलटने “तुम्ही इंजिन कट ऑफ का केलं?” असा प्रश्न विचारल्याचे नमूद करण्यात आले होते. त्यावर दुसऱ्या पायलटने “मी नाही केलं” असं उत्तर दिल्याचा दावा अहवालात करण्यात आला होता.या संवादामुळे अपघातामागे मानवी चूक असू शकते, अशी चर्चा रंगली होती. काही तज्ज्ञांनी याला ‘कॉकपिट कन्फ्युजन’ म्हटलं, तर काहींनी तांत्रिक बिघाडाची शक्यता नाकारली नव्हती.
कुटुंबीय आणि वैमानिक संघटनांचा आक्षेप
मात्र या प्राथमिक निष्कर्षांवर सभरवाल यांच्या कुटुंबीयांनी तीव्र आक्षेप घेतला होता. त्यांचे ८८ वर्षीय वडील पुष्कराज सभरवाल यांनी फेडरेशन ऑफ इंडियन पायलट्सच्या मदतीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
त्यांच्या मते, तपास अहवाल एकतर्फी असून मृत वैमानिकांवर अन्यायकारक आरोप करण्यात आले आहेत. स्वतःचा बचाव करण्यासाठी ते आता जिवंत नाहीत, त्यामुळे त्यांच्यावर दोषारोप करणं चुकीचं असल्याचं त्यांनी म्हटलं.सर्वोच्च न्यायालयानेही प्राथमिक अहवालातील काही निष्कर्षांवर नाराजी व्यक्त केली होती आणि “अशा प्रकारचे दावे दुर्दैवी आहेत” असे निरीक्षण नोंदवले होते.
अंतिम अहवालाची प्रतीक्षा
नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांनी लोकांना कोणताही निष्कर्ष काढण्याची घाई करू नये, असे आवाहन केले आहे. तपास पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने सुरू असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
तसेच पुढील महिन्यात अंतिम तपास अहवाल सादर केला जाईल आणि त्यातून अपघाताचे खरे कारण स्पष्ट होईल, असेही त्यांनी सांगितले आहे.दरम्यान, सभरवाल यांच्या मृतदेहाबाबत समोर आलेल्या दाव्यामुळे या प्रकरणाला पुन्हा भावनिक वळण मिळाले आहे. अपघाताच्या शेवटच्या क्षणापर्यंत एक वैमानिक आपल्या प्रवाशांना वाचवण्यासाठी झुंज देत होता का, हा प्रश्न आता देशभरात चर्चिला जात आहे.
