मराठी सिनेमा विश्वात चरित्रपटांचं ‘पीक’; ‘ढसाळ’, ‘खाशाबा’सह अनेक दमदार सिनेमांची चर्चा
मराठी चित्रपटसृष्टीमध्ये सध्या एका नव्या पर्वाची जोरदार सुरुवात होताना दिसत आहे. ही नवी लाट आहे चरित्रपटांची! एकेकाळी अधूनमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणारे बायोपिक आता मोठ्या प्रमाणावर तयार होत असून, आगामी काळात मराठी सिनेमांमध्ये चरित्रपटांचं अक्षरशः ‘पीक’ येणार असल्याचं स्पष्ट संकेत मिळत आहेत. ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वं, समाजसुधारक, साहित्यिक, लोककलावंत, क्रीडापटू आणि राजकीय नेत्यांच्या जीवनप्रवासावर आधारित अनेक भव्य चित्रपट सध्या निर्मिती प्रक्रियेत आहेत.
प्रेक्षकांच्या आवडीतही मोठा बदल झाला आहे. केवळ काल्पनिक कथा पाहण्यापेक्षा खऱ्या आयुष्यात संघर्ष करून इतिहास घडवणाऱ्या व्यक्तींच्या कथा पाहण्याकडे आता लोकांचा अधिक कल वाढला आहे. त्यामुळे निर्माते आणि दिग्दर्शकही वास्तववादी आणि प्रेरणादायी विषयांकडे वळताना दिसत आहेत.
मराठी सिनेमात चरित्रपटांची परंपरा नवी नाही. ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ने भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांचा संघर्ष मोठ्या पडद्यावर आणला होता. त्यानंतर ‘मी सिंधुताई सपकाळ’, ‘बालगंधर्व’, ‘तुकाराम’, ‘लोकमान्य’, ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे’, ‘यशवंतराव चव्हाण : बखर एका वादळाची’, ‘एक अलबेला’, ‘महाराष्ट्र शाहीर’, ‘मी वसंतराव’ आणि ‘धर्मवीर’ यांसारख्या चित्रपटांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. या सिनेमांनी केवळ बॉक्स ऑफिसवर यश मिळवलं नाही, तर मराठी संस्कृती आणि इतिहासाबद्दलची जाणीवही अधिक समृद्ध केली.
Related News
आता या यशस्वी परंपरेला पुढे नेत अनेक मोठे प्रकल्प समोर येत आहेत. त्यातील सर्वाधिक चर्चेत असलेला सिनेमा म्हणजे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा ‘खाशाबा’. भारताला वैयक्तिक ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे पहिले कुस्तीपटू खाशाबा दादासाहेब जाधव यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट प्रेक्षकांसाठी खास आकर्षण ठरत आहे. ग्रामीण महाराष्ट्रातून जागतिक स्तरावर पोहोचलेल्या एका खेळाडूचा संघर्ष, जिद्द आणि आत्मविश्वास या सिनेमातून मांडला जाणार आहे. नागराज मंजुळे यांच्या वास्तववादी शैलीमुळे या चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत.
इतिहास आणि स्वराज्याच्या परंपरेवर आधारित अनेक सिनेमेही प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ सिनेमाच्या यशानंतर आता ‘राजा शिवछत्रपती’चीही तयारी सुरू झाली आहे. त्याचबरोबर संतोष डावखर दिग्दर्शित ‘शहाजीराजे’, दिग्पाल लांजेकर यांचा ‘दर्याभवानी’, सोनाली कुलकर्णी अभिनित ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ आणि तेजस्विनी पंडितची ‘स्वराज्य कनिका जिजाऊ’ हे चित्रपट इतिहासातील सुवर्ण अध्याय पुन्हा उलगडणार आहेत.
महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘वीर दौडले सात’ या चित्रपटाचीही सध्या मोठी चर्चा सुरू आहे. शिवकालीन पराक्रम आणि स्वराज्यासाठी झटणाऱ्या वीरांच्या कथा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
लोककला आणि ग्रामीण संस्कृतीवर आधारित चित्रपटही या नव्या लाटेचा महत्त्वाचा भाग ठरत आहेत. ‘खंजिरीचे बोल’ आणि ‘लोकशाहीर पट्ठे बापूराव’ यांसारखे चित्रपट महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा अस्सल चेहरा प्रेक्षकांसमोर आणणार आहेत. तमाशा, लोकगीतं, शाहिरी परंपरा आणि ग्रामीण जीवनातील संघर्ष या माध्यमातून नव्या पिढीला महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाची ओळख होणार आहे.
दरम्यान, सर्वाधिक उत्सुकता निर्माण करणारा आणखी एक चित्रपट म्हणजे ‘ढसाळ’. पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या जीवनावर आधारित हा सिनेमा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. दलित पँथर चळवळीतील महत्त्वाचं नाव, विद्रोही कवी आणि सामाजिक विचारवंत म्हणून ओळख असलेल्या नामदेव ढसाळ यांचा संघर्ष आणि विचार या चित्रपटातून उलगडला जाणार आहे.
या चित्रपटात अभिनेता ललित प्रभाकर नामदेव ढसाळ यांची भूमिका साकारत आहे. या भूमिकेबद्दल बोलताना ललित प्रभाकर म्हणाला की, “नामदेव ढसाळ यांच्यासारख्या ज्वालामुखीस्वभावाच्या विचारवंताला समजून घेणं ही मोठी जबाबदारी आहे. त्यांच्यासारखं दिसण्यासाठी आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील आक्रमकता समजून घेण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतली.”
संतोष डावखर यांनी ‘शहाजीराजे’ या चित्रपटाबद्दल बोलताना सांगितलं की, “शहाजीराजे हे केवळ शिवाजी महाराजांचे वडील नव्हते, तर अत्यंत दूरदृष्टी असलेले शूर नेते होते. त्यांचा संघर्ष आणि राजकीय विचार नव्या पिढीसमोर आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. हा सिनेमा सहा भाषांमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे.”
