आयुष्य संपवण्यासाठी विहिरीत उडी…  ७ दिवसांनंतर जिवंत बाहेर

त्या विहिरीत साप, विंचू पाल यासह अनेक विषारी किटक होते

छपरा : एका महिलेने विहिरीत उडी मारुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पण त्यानंतर असं काही घडलं, की सर्वच लोक हैराण झाले. सात दिवसांपूर्वी महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केला, पण सात दिवसांनंतरही ती विहिरीतून सुरक्षित, जीवंत बाहेर आल्याने या घटनेची परिसरात एकच चर्चा आहे. महिला अशाप्रकारे वाचल्यानंतर ही देवाचीच कृपा असल्याची भावना व्यक्त होत आहे.
बिहारच्या सारण जिल्ह्यातील पानापूर येथील मोहम्मदपूर गावात ही घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महिला तिच्या घरातून सात दिवसांपासून बेपत्ता झाली होती. पतीसोबत वाद झाल्यानंतर तिने घरं सोडलं होतं. या दरम्यान तिने एका विहिरीत उडी आत्महत्येचा प्रयत्न केला. ज्या विहिरीत महिलेने उडी मारली त्या विहिरीत साप, विंचू पाल यासह अनेक विषारी किटक होते. सात दिवस महिला या विहिरीत या किटकांसोबत राहिली होती.
मीडिया रिपोर्टनुसार, महिलेची ओळख मीरा देवी अशी झाली आहे. कुटुंबातील भांडणांमुळे तिने टोकाचं पाऊल उचलत विहिरीत उडी मारुन आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला. पण देव तारी त्याला कोण मारी …. या उक्तीनुसार ती बचावली. सात दिवस आधी तिने घर सोडलं होतं. त्यानंतर तिचा कुटुंबियांकडून तपास सुरू होता. पण ती कुठेही सापडत नव्हती. नवरात्रीच्या नवमीच्या दिवशी विहिर जिथे आहे त्या गावातील काही मुलं विहिरीजवळ गेली असता, त्यांचा विहिरीतून ओरडण्याचा आवाज ऐकू आला. मुलांनी घाबरुन तिथून पळ काढला, पण त्यांनी ही बाब गावातील लोकांना सांगितली. त्यानंतर ग्रामस्थांनी विहिरीजवळ येऊन पाहिलं त्यावेळी त्यांना महिला आत पडलेली दिसली. त्यानंतर त्यांनी महिलेला बाहेर काढलं.महिलेला विहिरीतून जीवंत बाहेर काढल्यानंतर तिच्या कुटुंबियांनी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सात दिवस महिला उपाशी होती. त्यामुळे ती अतिशय कमकुवत झाली होती. महत्त्वाची बाब म्हणजे विंचू, साप, पालींसोबत विहिरीत राहूनही ती पूर्णपणे सुरक्षित होती. तिला कोणतीही दुखापत झाली नव्हती. याचीच सर्वत्र चर्चा होत आहे.