नाशिक शहरात उघडकीस आलेल्या बहुचर्चित धर्मांतर, लैंगिक छळ आणि विनयभंग प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. बहुराष्ट्रीय कंपनीतील HR अधिकारी अश्विनी अशोक चैनानी (वय ५१, रा. पुणे) हिला नाशिक पोलिसांनी पुण्यातून अटक केली आहे. या प्रकरणात आतापर्यंत एकूण नऊ गुन्हे दाखल असून, आठ महिला आणि एका पुरुषाने तक्रार दाखल केली आहे. प्रकरणातील गंभीर स्वरूप लक्षात घेऊन नाशिक पोलिस आयुक्तालयाच्या विशेष तपास पथकाने (SIT) तपास अधिक तीव्र केला आहे.
कंपनीतील HR वर गंभीर आरोप
तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, संबंधित HR अधिकारी अश्विनी चैनानी हिने कंपनीतील आठ तरुणींशी अनैतिक जवळीक साधल्याचा आरोप आहे. त्यापैकी एका पीडितेवर लैंगिक अत्याचार झाल्याचा आणि एका तरुणाचे जबरदस्तीने धर्मांतर करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
पीडितांच्या तक्रारीनुसार, HR अधिकारी आणि काही पुरुष सहकाऱ्यांनी मिळून एक साखळी स्वरूपातील छळाचा प्रकार राबविल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणामुळे नाशिक शहरातील औद्योगिक व कॉर्पोरेट वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
Related News
नऊ गुन्हे दाखल, अनेक आरोपी रडारवर
या प्रकरणात नाशिक शहरातील देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात एक आणि मुंबई नाका पोलीस ठाण्यात आठ असे एकूण नऊ गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. त्यामध्ये एकूण आठ महिला आणि एक पुरुष तक्रारदार आहेत.
आतापर्यंत सहा पुरुष आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यामध्ये आसिफ अन्सारी, शफी शेख, रझा मेमन, तौसिफ अत्तार आणि शाहरुख कुरेशी यांचा समावेश आहे. आरोपी दानिश शेख सध्या नाशिकरोड कारागृहात आहे, तर निदा खान अजूनही फरार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
न्यायालयीन कारवाई आणि कोठडी
अटक करण्यात आलेल्या आरोपींना नाशिक जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने काही आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली असून, HR अश्विनी चैनानीला १३ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.
सरकारी पक्षाने आरोपी तपासात सहकार्य करत नसल्याचा आणि पुरावे गोळा करण्यासाठी अधिक वेळ आवश्यक असल्याचा युक्तिवाद केला. मात्र, बचाव पक्षाने सबळ पुरावे अद्याप सादर झालेले नाहीत असा दावा करत पोलिस कोठडी वाढविण्यास विरोध केला.
पुण्यातून अटक; कंपनी परिसरात मोठी कारवाई
विशेष तपास पथकाने (SIT) पुण्यातील कंपनी परिसरातून अश्विनी चैनानीला ताब्यात घेतले. सुरुवातीला चौकशी करून तिला नोटीस देऊन सोडण्यात आले होते. मात्र, त्यानंतर पुरावे आणि तक्रारींच्या आधारे पुन्हा अटक करण्यात आली.या कारवाईमुळे कंपनीतील इतर अधिकारी आणि कर्मचारी देखील आता तपासाच्या रडारवर आले आहेत. SIT चे पथक गेल्या काही दिवसांपासून पुण्यात तळ ठोकून तपास करत होते.
तक्रारींकडे दुर्लक्ष; “वर्कलोड” वाढवण्याचा आरोप
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, काही पीडितांनी कंपनी व्यवस्थापनाकडे लेखी आणि तोंडी तक्रारी केल्या होत्या. मात्र, त्या तक्रारींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप आहे.याशिवाय, तक्रार करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अतिरिक्त “वर्कलोड” देऊन मानसिक दबाव टाकल्याचेही तपासात समोर येत आहे. या प्रकारामुळे छळ अधिक वाढल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
पीडिता उच्चशिक्षित; आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी
या प्रकरणातील सर्व पीडित महिला पदवीधर आणि उच्चपदवीधर आहेत. त्यांना १८ ते २२ हजार रुपये वेतन मिळत असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, आर्थिकदृष्ट्या सक्षम असूनही त्यांच्यावर झालेल्या कथित छळामुळे कॉर्पोरेट क्षेत्रातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
SIT तपासाला वेग
या प्रकरणाचा तपास नाशिक पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या निर्देशानुसार सुरू आहे. गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त संदीप मिटके, देवळाली कॅम्प आणि मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी यांचा समावेश असलेले 12 सदस्यीय विशेष तपास पथक (SIT) या प्रकरणाचा तपास करत आहे.
व्यवस्थापनावरही कारवाईची शक्यता
तपास यंत्रणांच्या प्राथमिक निष्कर्षांनुसार, केवळ वैयक्तिक आरोपी नव्हे तर कंपनीतील उच्च व्यवस्थापनातील अधिकाऱ्यांची भूमिकाही संशयाच्या भोवऱ्यात आहे. तक्रारींकडे दुर्लक्ष का करण्यात आले, याबाबत आता चौकशी सुरू आहे.कंपनीचे देशभरात अनेक शाखा असून, या प्रकरणामुळे तिच्या प्रतिमेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.नाशिकमधील हे प्रकरण केवळ गुन्हेगारी स्वरूपापुरते मर्यादित नसून, कॉर्पोरेट कामकाज, महिला सुरक्षा आणि संस्थात्मक जबाबदारी यावर गंभीर प्रश्न उपस्थित करणारे आहे. पोलिस तपास जसजसा पुढे जाईल, तसतसे या प्रकरणातील अधिक धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता आहे.
read also : https://ajinkyabharat.com/ranbir-kapoors-ramayan-deepika-chikhliyans-tola-with-a-budget-of-rs-4000-crores/
