नवी मुंबईतील मोसारे गावात स्फोटक साठ्यामुळे भीतीचे वातावरण

नवी मुंबई

नवी मुंबई, पनवेल परिसरातील मोसारे गावात सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या कामासाठी मोठ्या प्रमाणावर स्फोटकांचा साठा करण्यात आला असून, त्या साठ्याच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. स्थानिक नागरिकांनी केलेल्या आरोपांनुसार, स्फोटके साठवण्यासाठी उभारण्यात आलेल्या “मॅगझिन”मध्ये आवश्यक सुरक्षा नियमांचे पालन होत नसल्याने मोठ्या दुर्घटनेची भीती व्यक्त केली जात आहे.

नवी मुंबई विमानतळाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. डोंगर कापणे, ब्लास्टिंग करणे आणि भू-सुधारणा यांसारख्या कामांसाठी दररोज मोठ्या प्रमाणावर जिलेटिन कांड्या आणि डेटोनेटरचा वापर केला जातो. याच स्फोटकांचा साठा मोसारे गावाजवळील डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या मॅगझिनमध्ये ठेवण्यात आला आहे. मात्र, या साठ्याची सुरक्षा अत्यंत सुमार असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून होत आहे.

मॅगझिन म्हणजे स्फोटके सुरक्षितपणे साठवण्यासाठी शासनाने ठरवलेल्या नियमांनुसार उभारलेले विशेष स्टोरेज असते. अशा ठिकाणी मजबूत बांधकाम, कडक लॉकिंग सिस्टम, प्रशिक्षित सुरक्षा रक्षक, चेतावणी फलक, प्रवेशबंदी आणि सीसीटीव्ही यंत्रणा असणे बंधनकारक असते. परंतु मोसारे गावाजवळील या मॅगझिनमध्ये ना पुरेशी सुरक्षा रक्षक व्यवस्था आहे, ना कोणतीही सीसीटीव्ही देखरेख असल्याचे स्थानिकांनी सांगितले आहे. त्यामुळे स्फोटकांची चोरी किंवा गैरवापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Related News

या मॅगझिनच्या अगदी जवळ मोसारे गावाची वस्ती तसेच जिल्हा परिषद शाळा असल्यामुळे नागरिकांमध्ये अधिकच भीती पसरली आहे. शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. एखादी दुर्घटना घडल्यास त्याचा थेट परिणाम गावावर आणि शाळेवर होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, या ठिकाणी कोणतीही ठोस फायर सेफ्टी व्यवस्था उपलब्ध नाही. अग्निशमन यंत्रणा, पाण्याची सोय, आपत्कालीन मार्ग यांसारख्या मूलभूत सुविधा नसल्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत मोठा धोका निर्माण होऊ शकतो. शिवाय, या मॅगझिनपर्यंत पोहोचण्यासाठी योग्य रस्ता नसल्याचेही समोर आले आहे, त्यामुळे आपत्कालीन सेवांना घटनास्थळी पोहोचणे कठीण होऊ शकते.

उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर धोका अधिक वाढला आहे. सध्या तापमान ४१ ते ४२ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले असून, डोंगराळ भागात वनवे लागण्याच्या घटना सामान्य आहेत. काही वेळा डोंगर मोकळा करण्यासाठी जाणीवपूर्वक आग लावली जाते, असेही स्थानिकांचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत जर आगीची ठिणगी स्फोटक साठ्यापर्यंत पोहोचली, तर मोठा स्फोट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

याशिवाय, स्फोटक मॅगझिन उभारण्यात आलेली जमीन वन विभागाच्या अखत्यारीत येते का, याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. जर ही जमीन वनक्षेत्रात येत असेल, तर आवश्यक परवानग्या घेण्यात आल्या आहेत का, याची चौकशी करण्याची मागणी होत आहे. तसेच खाजगी जमीन असल्यास ती कोणत्या अटींवर भाड्याने देण्यात आली, याबाबतही स्पष्टता नसल्याने संशयाचे वातावरण आहे.

दरम्यान, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासारख्या संवेदनशील प्रकल्पाच्या अगदी जवळ इतक्या मोठ्या प्रमाणात स्फोटकांचा साठा ठेवण्यात आल्यामुळे सुरक्षेबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. योग्य देखरेख आणि सुरक्षा व्यवस्था नसल्यास भविष्यात हा साठा गंभीर धोका ठरू शकतो.या प्रकरणात स्फोटक साठ्याची क्षमता, परवानग्या आणि सुरक्षा उपाययोजना यांची सखोल चौकशी करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. जर तपासात नियमांचे उल्लंघन आढळले, तर संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. आता या प्रकरणात प्रशासन आणि पोलीस कोणती भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

read also : https://ajinkyabharat.com/gurugram-hyderabad-2-year-old-chimuklis-father-jumped-from-the-23rd-floor-decision-was-taken-due-to-his-promiscuity/

Related News