पिंपरीत प्रशासनाचा हलगर्जीपणा उघड ; दूषित पाण्यामुळे आदिवासी वसतिगृहातील २० विद्यार्थी रुग्णालयात

आदिवासी

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहरात प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे आदिवासी विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहात दूषित पाणी पिल्यामुळे २० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना घडली असून या प्रकरणामुळे शहरात खळबळ उडाली आहे. प्रकृती बिघडलेल्या विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून काही विद्यार्थ्यांवर अद्याप उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून पालकांनी प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड येथील आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी वसतिगृहातील पाणी पिल्यानंतर अचानक अस्वस्थता जाणवू लागली. काही विद्यार्थ्यांना उलट्या, जुलाब, मळमळ तसेच अशक्तपणा जाणवू लागला. विद्यार्थ्यांची प्रकृती झपाट्याने बिघडू लागल्याने वसतिगृह प्रशासनाने तातडीने सर्व विद्यार्थ्यांना उपचारासाठी भोसरी येथील महानगरपालिकेच्या रुग्णालयात हलवले.

रुग्णालयात दाखल झालेल्या विद्यार्थ्यांची तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना विषबाधेची लक्षणे असल्याचे सांगितले. प्राथमिक उपचारानंतर काही विद्यार्थ्यांची प्रकृती सुधारल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. मात्र ८ ते १० विद्यार्थ्यांवर अजूनही वैद्यकीय उपचार सुरू आहेत. सध्या सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मुख्य वैद्यकीय अधिकारी लक्ष्मण गोफणे यांनी दिली आहे.

Related News

या घटनेनंतर विद्यार्थ्यांनी वसतिगृहातील सुविधांबाबत गंभीर आरोप केले आहेत. शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा निधी मिळूनही वसतिगृहातील मूलभूत सुविधांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. विशेषतः पिण्याच्या पाण्यासाठी लावण्यात आलेला वॉटर फिल्टर अनेक दिवसांपासून नादुरुस्त असल्याचे त्यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, वॉटर फिल्टर बंद असल्यामुळे त्यांना स्वच्छ पाणी मिळत नव्हते. याबाबत त्यांनी वसतिगृह प्रशासनाकडे अनेक वेळा तक्रार केली होती. मात्र वारंवार तक्रार करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. परिणामी विद्यार्थ्यांना बाहेरून पाणी आणून पिण्याची वेळ आली. काही विद्यार्थ्यांनी वसतिगृह परिसरातील उपलब्ध पाणी पिल्यानेच ही विषबाधा झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

या संदर्भातील व्हिडिओ विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर व्हायरल केला होता. त्या व्हिडिओमध्ये विद्यार्थ्यांनी स्वच्छ पाणी मिळावे, तसेच वसतिगृहातील वॉटर फिल्टर तातडीने दुरुस्त करावा, अशी मागणी केली होती. मात्र या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने अखेर ही गंभीर घटना घडल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.

दरम्यान, इतकी गंभीर घटना घडूनही संबंधित अधिकाऱ्यांनी अद्याप अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. आदिवासी प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई यांनी या घटनेवर मौन बाळगल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी संबंधित एवढ्या गंभीर विषयाकडे दुर्लक्ष झाल्याने प्रशासनावर टीकेची झोड उठली आहे.

या घटनेची माहिती मिळताच पालक मोठ्या संख्येने रुग्णालयात दाखल झाले. आपल्या मुलांची प्रकृती पाहून पालकांनी संताप व्यक्त केला. शासनाकडून वसतिगृहांसाठी मोठा निधी दिला जात असताना विद्यार्थ्यांना स्वच्छ पाणी देखील मिळत नाही, ही अत्यंत दुर्दैवी बाब असल्याचे पालकांनी सांगितले.

पालकांनी प्रशासनावर गंभीर आरोप करत जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा, तसेच वसतिगृहातील सर्व सुविधा तातडीने दुरुस्त करून विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

दरम्यान, या घटनेनंतर महानगरपालिका प्रशासनाने वसतिगृहातील पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवले असल्याची माहिती समोर येत आहे. पाण्याच्या गुणवत्तेबाबतचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, असे सांगण्यात येत आहे.

या घटनेमुळे पिंपरी-चिंचवड परिसरात मोठी खळबळ उडाली असून शासकीय वसतिगृहांमधील विद्यार्थ्यांच्या आरोग्य आणि सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करणे गरजेचे असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

read also :  https://ajinkyabharat.com/symposium-at-amity-law-school-on-save-himalayas-save-earth-gathering-of-reformers-from-across-the-country/

Related News