LPG Shortage : तक्रार कुणाकडे करायची? घरपोच सेवा बंद, गॅस बुकिंगचे नंबरही बंद; नागरिकांचा संताप उसळला
राज्यात सध्या एलपीजी गॅस टंचाईने नागरिकांचे अक्षरशः हाल होत असल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून गॅस सिलेंडरचा पुरवठा विस्कळीत झाल्याने शहरी आणि ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात गैरसोय निर्माण झाली आहे. घरपोच सेवा बंद पडली असून गॅस बुकिंगसाठी दिलेले फोन नंबरही सतत बंद येत असल्याने नागरिक संतप्त झाले आहेत.
“आता तक्रार तरी कुणाकडे करायची?” असा संतप्त सवाल सर्वसामान्य नागरिकांकडून विचारला जात आहे. भर उन्हात तासन्तास रांगेत उभे राहूनही सिलेंडर मिळेल याची शाश्वती नसल्याने लोकांचा पारा वाढला आहे. अनेक ठिकाणी गॅस एजन्सीसमोर गोंधळ, बाचाबाची आणि आंदोलनाची स्थिती निर्माण झाली आहे.
घरपोच सेवा ठप्प; ग्राहक मेटाकुटीला
आतापर्यंत घरपोच सिलेंडर देणाऱ्या गॅस कंपन्यांनी अचानक डिलिव्हरी सेवा बंद केल्याचे नागरिक सांगत आहेत. बुकिंग केल्यानंतरही सिलेंडर वेळेवर मिळत नाही. अनेक ठिकाणी ऑनलाइन बुकिंग सुविधा नीट कार्यरत नसल्याच्या तक्रारी आहेत.
गॅस एजन्सीशी संपर्क साधण्यासाठी दिलेले फोन नंबर बंद येत असल्याने ग्राहकांना अधिकच मनस्ताप सहन करावा लागत आहे. परिणामी नागरिकांना एजन्सीच्या बाहेर लांबच लांब रांगा लावाव्या लागत आहेत. दरम्यान प्रशासनाकडून गॅस साठा पुरेसा असल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात ग्राहकांना सिलेंडर मिळत नसल्याचे चित्र दिसत आहे.
बीडमध्ये नागरिक त्रस्त; एजन्सीवर गदारोळ
बीड जिल्ह्यात गॅस एजन्सीच्या कारभारामुळे नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. घरपोच सेवा पूर्णपणे बंद असल्याने ग्राहकांना स्वतः एजन्सीवर जावे लागत आहे.
बुकिंगसाठी दिलेले फोन नंबर सतत बंद येत असल्याने नागरिकांच्या संतापाचा कडेलोट झाला आहे. काही ठिकाणी एजन्सीवर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली असून कर्मचाऱ्यांसोबत बाचाबाचीचे प्रकारही घडले आहेत. युद्धामुळे गॅस पुरवठ्यावर परिणाम होत असल्याचे सांगितले जात असले तरी सामान्य नागरिकांना त्याचा थेट फटका बसत आहे.
धुळ्यात नोंदणी करूनही गॅस नाही
धुळे शहरातही गॅस टंचाईचे गंभीर चित्र दिसत आहे. सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांची एजन्सीसमोर मोठी गर्दी झाली आहे. नोंदणी करूनही पंधरा दिवस उलटून गेले तरी घरपोच गॅस मिळत नसल्याने लोक संतप्त झाले आहेत. काही ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांनाही सिलेंडरसाठी रांगेत उभे राहावे लागत असल्याचे दिसून आले. या परिस्थितीमुळे शहरातील दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे.
जालन्यात एजन्सी उघडण्यापूर्वीच रांगा
जालन्यातील बदनापूर भागात गॅस एजन्सी उघडण्यापूर्वीच नागरिकांची तोबा गर्दी होत आहे. सिलेंडर मिळणार नाही या भीतीने लोक पहाटेपासून रांगेत उभे राहत आहेत.
बुकिंग करूनही गॅस मिळेल की नाही याची खात्री नसल्याने नागरिक आणि एजन्सी कर्मचाऱ्यांमध्ये वादाचे प्रसंग घडत आहेत. ग्रामीण भागात गॅस पाइपलाइन नसल्याने नागरिक पूर्णपणे सिलेंडरवर अवलंबून आहेत. त्यामुळे टंचाईचा परिणाम अधिक तीव्रतेने जाणवत आहे.
चाळीसगाव तालुक्यात टंचाई; नागरिकांची धावपळ
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात घरगुती गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे. पहाटेपासूनच नागरिक एजन्सीवर गर्दी करत आहेत. सरकारकडून गॅस साठा पुरेसा असल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात सिलेंडर उपलब्ध नसल्याने ग्राहकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. काही नागरिकांनी कृत्रिम टंचाई निर्माण करून जादा दराने सिलेंडर विक्री होत असल्याचा आरोप केला आहे.
गडचिरोलीत दुर्गम भागात मोठी कसरत
गडचिरोली जिल्ह्यातही गॅस टंचाईचे संकट जाणवत आहे. दुर्गम भाग असल्याने येथे पुरवठा आणखी उशिरा पोहोचतो. जवळपास ७० टक्के नागरिक एलपीजीवर अवलंबून असल्याने सिलेंडर मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. शहरापासून आष्टी, आलापल्ली, अहेरी आणि सिरोंचा भागातही नागरिकांना दीर्घ प्रतीक्षा करावी लागत आहे. काहींना एक सिलेंडर मिळवण्यासाठी अनेक दिवस वाट पाहावी लागत असल्याचे सांगितले जात आहे.
मुंबईतही गंभीर स्थिती; कांदिवली पोईसर भागात रांगा
मुंबईतील कांदिवली पोईसर भागात गॅस पाइपलाइन नसल्याने नागरिक पूर्णपणे सिलेंडरवर अवलंबून आहेत. सिलेंडर गाडी येण्याची वाट पाहत लोक पहाटे ५ वाजल्यापासून रांगेत उभे राहत आहेत. महिलांसह वृद्ध आणि लहान मुलेही या रांगेत दिसत आहेत. आज सिलेंडर मिळेल की नाही, याची खात्री नसल्याने लोकांमध्ये अस्वस्थता वाढली आहे.
संताप वाढत असताना उपाययोजनांची गरज
गॅस टंचाईमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.गॅस बुकिंग व्यवस्था सुरळीत करणे, घरपोच सेवा पुन्हा सुरू करणे आणि कृत्रिम टंचाईवर कारवाई करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
दीर्घकालीन उपाय म्हणून ऊर्जा पुरवठा साखळी मजबूत करणे आणि पर्यायी इंधन स्रोतांचा वापर वाढवणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञ सांगतात. सध्या मात्र नागरिकांच्या संयमाची परीक्षा सुरू असून परिस्थिती लवकर सुधारेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
