Bigg Boss Marathi 6 : रुचिता जामदार एलिमिनेट? सोशल मीडियावर जोरदार चर्चा, विशाल पडणार एकटा!
लोकप्रिय रिअॅलिटी शो Bigg Boss Marathi Season 6 मध्ये दर आठवड्याला होणाऱ्या एलिमिनेशनमुळे प्रेक्षकांची उत्सुकता कायमच वाढलेली असते. सध्या मात्र शोबाबत एक धक्कादायक अपडेट समोर आली आहे. सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू असून स्पर्धक रुचिता जामदार हिचा बिग बॉसच्या घरातील प्रवास संपल्याची माहिती समोर येत आहे. शो सुरू होऊन जवळपास ५० दिवस पूर्ण झाल्यानंतर रुचिताला घराबाहेर जावे लागल्याचे बोलले जात आहे.
Bigg Boss Marathi 6 : प्रेक्षकांमध्ये मिश्र प्रतिक्रिया
रुचिता जामदार ही सुरुवातीपासूनच चर्चेत राहिलेली स्पर्धक होती. तिची खेळातील स्ट्रॅटेजी, गेम प्लॅन आणि टास्कमधील आक्रमकता यामुळे ती मजबूत स्पर्धक मानली जात होती. अनेकांना ती टॉप ५ मध्ये पोहोचेल अशी अपेक्षा होती. मात्र तिच्या वागण्याच्या काही सवयी प्रेक्षकांना खटकत असल्याचे वारंवार सोशल मीडियावर दिसत होते.
विशेषतः घरातील वादांमध्ये सतत आरडाओरडा करणे, इतरांच्या चर्चेत हस्तक्षेप करून आवाज चढवणे या गोष्टींमुळे प्रेक्षकांमध्ये नाराजी वाढली होती. बिग बॉसच्या अनेक प्रोमो आणि क्लिप्समध्ये देखील रुचिताला बाहेर काढण्याची मागणी होताना दिसत होती. अखेर प्रेक्षकांच्या कौलानुसार तिचा प्रवास येथेच थांबणार असल्याची चर्चा रंगली आहे.
Related News
विशाल-रुचिता मैत्री चर्चेत
गेल्या काही आठवड्यांपासून घरात सर्वाधिक चर्चेत असलेली जोडी म्हणजे विशाल आणि रुचिता. दोघांनाही गेल्या आठवड्यात मोठ्या प्रमाणात स्क्रीन टाईम मिळालेला दिसला. त्यांच्या मैत्रीबाबत तसेच गेममधील रणनीतीबाबत घरात अनेकदा चर्चा होत होती.
काही दिवसांपूर्वी रुचिताने विशालवरील तिच्या भावना देखील व्यक्त केल्या होत्या. त्यामुळे प्रेक्षकांमध्येही या नात्याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. मात्र या नात्यातही काही तणाव निर्माण झाल्याचे अलीकडील एपिसोडमध्ये दिसून आले.
Bigg Boss Marathi 6 : पॉवर की प्रकरणामुळे वाद
Bigg Boss Marathi 6 गेल्या आठवड्यातील एका टास्कदरम्यान रुचिताने विशालच्या खिशातूनच पॉवर की चोरल्याचे दिसून आले. या घटनेनंतर दोघांमध्ये मोठा वाद झाला. घरातील इतर स्पर्धकांनीही रुचिताला या कृतीबद्दल सावध केले होते.
तरीसुद्धा रुचिताने आपली भूमिका बदलली नाही आणि विशालला साथ देण्याचा निर्णय घेतला. मात्र या घटनेनंतर प्रेक्षकांच्या मतांमध्ये मोठा बदल झाल्याचे सांगितले जात आहे. अनेकांनी तिच्या या वागण्यावर नाराजी व्यक्त केली.
रितेश देशमुख यांचा वारंवार इशारा
दर आठवड्याला होणाऱ्या ‘भाऊच्या धक्क्या’मध्ये शोचे होस्ट रितेश देशमुख अनेकदा रुचिताला तिच्या वागण्याबाबत इशारा देताना दिसले. घरातील संवादाची पद्धत आणि इतर स्पर्धकांबरोबरचा तिचा दृष्टिकोन सुधारण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले होते.
मात्र इतक्या इशाऱ्यांनंतरही तिच्या वागण्यात फारसा बदल दिसून आला नाही. परिणामी प्रेक्षकांनी तिच्याविरोधात मत दिल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे तिचा बिग बॉस मराठीमधील प्रवास अपेक्षेपेक्षा लवकर संपल्याची चर्चा सुरू आहे.
वाइल्ड कार्ड स्पर्धकांची एन्ट्री
दरम्यान, गेल्या आठवड्यात शोमध्ये तीन नवीन वाइल्ड कार्ड स्पर्धकांची एन्ट्री झाली आहे. संस्कृती साळुंखे, रेवा कौरासे आणि संकेत पाठक यांनी घरात प्रवेश केला असून त्यांच्या आगमनामुळे गेममध्ये नवे समीकरण तयार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या नवीन सदस्यांच्या आगमनानंतर काही जुने स्पर्धक अस्वस्थ झाल्याचेही दिसून आले. रुचिताही काही प्रमाणात अस्वस्थ वाटत असल्याची चर्चा होती.
विशालसाठी नवे समीकरण?
रुचिता घराबाहेर गेल्याची चर्चा खरी ठरली तर त्याचा सर्वाधिक परिणाम विशालवर होण्याची शक्यता आहे. कारण त्याच्या टोळीतील जवळपास सर्व सदस्य आधीच एलिमिनेट झाले आहेत. त्यामुळे आता तो घरात जवळपास एकटाच उरणार असल्याचे दिसत आहे.
मात्र अलीकडील एपिसोड पाहता प्राजक्ता आणि विशाल यांच्यात काही प्रमाणात संवाद वाढताना दिसत आहे. त्यामुळे रुचिताच्या जाण्यानंतर विशालच्या गटात प्राजक्ता सहभागी होऊ शकते असा अंदाज प्रेक्षक व्यक्त करत आहेत.
