अकोला : बाळापूर व पातूर तालुक्यातील खारपाण आणि पाणीटंचाईने ग्रस्त गावांसाठी गोड पाणी पुरवठ्याचे काम तातडीने सुरू करण्याचा आमदार नितीन देशमुख यांनी संकल्प केला आहे. यासाठी नुकतीच शासकीय विश्राम गृह अकोला येथे आयोजित बैठकीत पाणी पुरवठा विभागाच्या उच्च अधिकाऱ्यांशी त्यांनी बैठक घेतली आणि कामाच्या प्रगतीचा सखोल आढावा घेतला.
बैठकीत बाळापूर तालुक्यातील मंजूर महत्वाकांशी ६९ खेडी, खंबोरा तालुक्यातील ६४ खेडी, वाडेगाव तालुक्यातील २४ खेडी तसेच पातूर तालुक्यातील आस्टूल-पास्टूल १६ खेडी आणि आलेगाव १४ खेडी या गावांमध्ये सुरू असलेल्या जल जीवन मिशन योजनांच्या कामांचा आढावा घेण्यात आला. यावेळी आमदार नितीन देशमुख यांनी अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित करत कामे तातडीने पूर्ण करण्याचे स्पष्ट आदेश दिले.
बैठकीत गोपाळ दातकर यांनी गाढा अभ्यासानुसार आगार आणि गांधीग्राम झोनमध्ये दोन दिवस आड पाणी पुरवठा होण्याचे कारण स्पष्ट केले. त्यांच्या मते, या झोनमध्ये नवीन पाईपलाइन नसल्यामुळे ताशी १ लाख ५७ हजार लिटर पाणी आवश्यक असताना केवळ ९० हजार लिटर पाणी पुरवले जात आहे. परिणामी गावांना १५ ते २० दिवस पाणी मिळत नाही. या समस्येवर उपाय म्हणून नवीन पाईपलाइन लावण्याचे मुद्दे अधिकाऱ्यांसमोर मांडले गेले, जे त्यांनी मान्य केले. नवीन पाइपलाइन पूर्ण झाल्यानंतर गावांना २ ते ३ दिवसांच्या अंतराने सुरळीत पाणी पुरवठा होईल, असा विश्वास गोपाळ दातकर यांनी व्यक्त केला.
Related News
याशिवाय, धामणा नवीन येथून धामणा जुने गावापर्यंत HDP पाइपलाइन त्वरित लावण्याचे आदेशही आमदार नितीन देशमुख यांनी दिले. तसेच जुन्या पाईपलाइनची तातडीने दुरुस्ती करण्याचे आदेश देखील या बैठकीत देण्यात आले. या बैठकीत जिल्हा प्रमुख गोपाळ दातकर, जिल्हा महिला संघटिका सरिता वाकोडे, माजी पंचायत समिती सदस्य गोपाळ ढोरे, माजी पंचायत समिती सदस्य अॅड. सूरज झडपे, ईश्वर भिसे, मजीप्रा चे अधीक्षक अभियंता एस.एस. गव्हाणकर, कार्यकारी अभियंता एम.एन. राठोड, जिल्हा परिषद ग्रामीण पुरवठा विभागाचे ए. बी. साळूखें, वान प्रकल्पांचे शाखा अभियंता नयन लोणारे इत्यादी अधिकारी उपस्थित होते.
या महत्वाकांक्षी योजनेला प्रारंभी २१९ कोटी रुपये प्रशासकीय मान्यता मिळाली होती. मात्र कामाचा खर्च २४७ कोटी रुपये झाला असल्यामुळे आमदार नितीन देशमुख यांनी पाठपुरावा करून आणखी २८ कोटी रुपये निधी वाढवून योजनेची पूर्णता सुनिश्चित केली. आतापर्यंत या योजनेचे ९५ टक्के काम पूर्ण झाले असून, उर्वरित ५ टक्के काम एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.
या कामाच्या पूर्णतेनंतर बाळापूर तालुक्यातील ६९ खेड्यांना वान धरणातील गोड पाणी उपलब्ध होणार आहे. काम पूर्ण करण्याची अंतिम मुदत १३ ऑक्टोबर २०२४ अशी आहे. या योजनेमुळे वर्षांपासून पाणीटंचाईने ग्रस्त असलेल्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे आणि त्यांची दैनंदिन जीवनमान सुधारेल, असा विश्वास आहे.
