प्रशासनाच्या उदासीनतेविरोधात शेतकऱ्यांचा तीव्र संताप
मलकापूर तालुक्यातील शेकडो फसवणूकग्रस्त शेतकरी व महिलांनी आपल्या हक्कासाठी आणि न्यायासाठी अखेर रस्त्यावर उतरून प्रशासनाचे लक्ष वेधले. शेतमालाच्या फसवणूक प्रकरणात ठोस कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ २४ जानेवारी रोजी सकाळपासून मलकापूर उपजिल्हा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली. प्रशासनाच्या उदासीनतेविरोधात शेतकऱ्यांचा संताप यावेळी उफाळून आला होता.
मलकापूर तालुक्यातील आरंभ ट्रेडिंग कंपनीचे मालक तसेच सुप्रसिद्ध डॉक्टर प्रफुल्ल पाटील यांनी शेतकऱ्यांना जास्त दराचे आमिष दाखवून मोठ्या प्रमाणावर शेतमाल खरेदी केला. मात्र खरेदी केलेल्या शेतमालाचे पैसे आजतागायत न देता संबंधित व्यापारी फरार झाल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण तालुक्यातील शेतकरी वर्ग आर्थिक अडचणीत सापडला आहे.
या फसवणूक प्रकरणी शेतकऱ्यांनी सर्वप्रथम १० ऑगस्ट २०२४ रोजी बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर तहसील कार्यालय, कृषी उत्पन्न बाजार समिती, जिल्हाधिकारी कार्यालय तसेच लोकप्रतिनिधी आणि मंत्र्यांकडे वेळोवेळी निवेदने देण्यात आली. मात्र इतका कालावधी लोटूनही संबंधित व्यापाऱ्यावर कोणतीही ठोस कारवाई करण्यात न आल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
Related News
आंदोलक शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भूमिकेवरही गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. लायसन्सधारक व्यापाऱ्यांवर नियंत्रण ठेवणे ही बाजार समितीची जबाबदारी असताना, या प्रकरणात संबंधित यंत्रणांनी डोळेझाक केल्याचा आरोप करण्यात आला. नियमानुसार शेतमाल खरेदी केल्यानंतर २४ तासांच्या आत शेतकऱ्यांना पैसे देणे बंधनकारक आहे. तरीही या व्यापाऱ्याने नियम धाब्यावर बसवून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक केली असून त्याच्यावर कोणतीही कठोर कारवाई झालेली नाही, ही बाब अत्यंत दुर्दैवी असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
या फसवणुकीचे परिणाम अत्यंत गंभीर स्वरूपाचे असल्याचे आंदोलनादरम्यान समोर आले. अनेक शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडले असून काही शेतकऱ्यांनी नैराश्यातून आत्महत्येचा मार्ग स्वीकारल्याची धक्कादायक माहिती आंदोलकांनी दिली. काही कुटुंबांतील मुलांचे परदेशातील शिक्षण अर्ध्यावरच थांबले, तर काही मुलींची ठरलेली लग्ने मोडली गेली. अनेक शेतकरी नव्या हंगामासाठी पुन्हा पेरणी करण्यासाठी आवश्यक भांडवल उभे करू शकले नाहीत.
याशिवाय बँक कर्जाच्या थकबाकीमुळे शेतकऱ्यांच्या मागे वसुली अधिकारी लागले असून, वारंवार तगादा लावला जात आहे. अतिवृष्टीमुळे आधीच शेतीचे मोठे नुकसान झाले असताना या आर्थिक फसवणुकीने शेतकऱ्यांची परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. “आमच्याकडे जगण्यासाठी दुसरा पर्याय उरलेला नाही, म्हणूनच आम्ही आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला,” अशी भावना अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
उपोषणस्थळी महिला शेतकरीही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. हातात फलक घेऊन “आम्हाला न्याय द्या”, “फसवणूक करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा” अशा घोषणा देत त्यांनी प्रशासनाचा निषेध केला. उपोषण सुरू असताना प्रशासनाकडून सुरुवातीला कोणतीही ठोस दखल घेतली न गेल्याने शेतकऱ्यांचा संताप आणखी वाढत गेला.
प्रशासनाने तातडीने कारवाई न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा यापूर्वीच शेतकऱ्यांनी दिला होता. परिस्थिती गंभीर बनत असल्याचे लक्षात आल्यानंतर अखेर मलकापूर मतदारसंघाचे आमदार चैनसुख संचेती यांनी या प्रकरणात मध्यस्थी केली. सायंकाळी सुमारे सहा वाजता त्यांनी उपोषणस्थळी भेट देऊन शेतकऱ्यांशी चर्चा केली व त्यांच्या मागण्यांबाबत प्रशासनाशी संवाद साधला.
आमदार संचेती यांच्या मध्यस्थीनंतर प्रशासनाकडून सकारात्मक आश्वासन देण्यात आल्यानंतर शेतकऱ्यांनी आपले आमरण उपोषण तात्पुरते स्थगित केले. मात्र दोषींवर तात्काळ कारवाई न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.
फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळतो की नाही, याकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले असून प्रशासनाची पुढील भूमिका निर्णायक ठरणार आहे.
read also : https://ajinkyabharat.com/washimchaya-risod-talukyat-chikhali-village-choricha-dhumakul/
