रायगड जिल्ह्यातील पेन तालुक्यात वाशी नाका परिसरात मुंबई–गोवा महामार्गावर गॅस सिलिंडर वाहून नेणाऱ्या एका पिकअप व्हॅनला अचानक आग लागल्याची घटना घडली. या घटनेमुळे महामार्गावर एकच खळबळ उडाली असून काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित पिकअप व्हॅन गॅस सिलिंडर घेऊन मुंबई–गोवा महामार्गावरून मार्गस्थ असताना वाशी नाका परिसरात अचानक वाहनाच्या मागील भागातून धूर येऊ लागला. काही क्षणांतच वाहनाला आग लागली. ही बाब लक्षात येताच चालकाने तात्काळ वाहन रस्त्याच्या कडेला थांबवले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्याने तत्काळ अग्निशामक यंत्राचा वापर करत आग विझवण्याचा प्रयत्न केला.
आग अधिक भडकू नये आणि मोठा स्फोट होऊ नये यासाठी चालकाने धाडसी निर्णय घेत वाहनातील गॅस सिलिंडर एकामागून एक बाहेर फेकण्यास सुरुवात केली. या दरम्यान पाच ते सहा सिलिंडरचे जोरदार स्फोट झाले. स्फोटांचा आवाज दूरपर्यंत ऐकू गेल्याने परिसरातील नागरिक आणि वाहनचालकांमध्ये घबराट पसरली. मात्र चालकाच्या वेळीच घेतलेल्या निर्णयामुळे वर्दळीच्या महामार्गावर मोठा अनर्थ टळला.
Related News
घटनेची माहिती मिळताच पेन नगरपालिकेचे अग्निशमन दल, पोलीस आणि आपत्कालीन यंत्रणा तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. या काळात सुरक्षिततेच्या दृष्टीने मुंबई–गोवा महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी रोखण्यात आली, त्यामुळे दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
अखेर काही वेळातच आग पूर्णपणे आटोक्यात आणण्यात यश आले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला. मात्र आगीत पिकअप व्हॅनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून परिसर सुरक्षित करण्यात आला आहे. तसेच ही आग नेमकी कशामुळे लागली, याबाबत तपास सुरू करण्यात आला असून सिलिंडर वाहतुकीतील सुरक्षिततेबाबतही चौकशी केली जात आहे.
