राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत एम. बी. कराटे अकॅडमीच्या खेळाडूंचे घवघवीत यश

एम. बी. कराटे

मूर्तिजापूर प्रतिनिधी :

मूर्तिजापूर : वूशू किंग इंटर मार्शल आर्ट असोसिएशन महाराष्ट्र यांच्या वतीने नुकतीच राज्यस्तरीय इंटर मार्शल आर्ट स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. या स्पर्धेचे आयोजन इंटर मार्शल क्लब वजो अकॅडमी, जिल्हा बुलढाणा येथे करण्यात आले होते. राज्यभरातील विविध जिल्ह्यांमधून नामांकित कराटे व मार्शल आर्ट खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. तीव्र स्पर्धात्मक वातावरणात पार पडलेल्या या स्पर्धेत एम. बी. कराटे अकॅडमी, मूर्तिजापूरच्या खेळाडूंनी आपल्या उत्कृष्ट कौशल्याचे प्रदर्शन करत घवघवीत यश संपादन केले.

एम. बी. कराटे अकॅडमीच्या खेळाडूंनी काता व कुमिते या दोन्ही प्रकारांमध्ये दमदार खेळ सादर करत प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावले. अचूक तंत्र, शिस्तबद्ध हालचाली, आत्मविश्वास आणि प्रतिस्पर्ध्यांवर मिळवलेले वर्चस्व यामुळे परीक्षकांचे लक्ष वेधून घेण्यात खेळाडूंना यश आले. विशेष म्हणजे, ही कामगिरी एम. बी. कराटे अकॅडमीचे अध्यक्ष व मुख्य प्रशिक्षक सेन्सई गंगाधर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली साध्य झाली असून त्यांच्या सातत्यपूर्ण प्रशिक्षणाचा व शिस्तीचा हा परिणाम असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

Related News

स्पर्धेनंतर पार पडलेल्या बक्षीस व प्रमाणपत्र वितरण सोहळ्यात कामगार कल्याण केंद्राचे प्रमुख विनोद इंगळे (मूर्तिजापूर), शिक्षक प्रशिक इंगळे व समीर जाधव हे मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विजेत्या खेळाडूंना पदके व प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. यावेळी खेळाडूंचे कौतुक करत मान्यवरांनी कराटेसारख्या मार्शल आर्ट खेळामुळे शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच मानसिक बळकटी, आत्मसंयम व शिस्त निर्माण होते, असे मत व्यक्त केले.

या स्पर्धेत चिन्मय राजुरकर, दुर्गेश वाकोडे, सूर्याश गोपकर, तन्मय ठाकरे, अर्जुन इटीवाले, वंश गोळे, पार्थ सिकची, प्रिन्स बिहानी, सान्वी कडू, अर्णव गांजाळे, दिव्या थोरात व सिद्धांश्री पेडोखरे या खेळाडूंनी उल्लेखनीय यश संपादन करत मूर्तिजापूर व जिल्ह्याचे नाव राज्यपातळीवर उज्वल केले. त्यांच्या या यशाबद्दल पालक, क्रीडाप्रेमी व स्थानिक नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून भविष्यात राष्ट्रीय स्तरावरही हे खेळाडू यश मिळवतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Related News