मोठी राजकीय खळबळ : राहुल नार्वेकर यांच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची ठाम मागणी
राज्यातील महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असतानाच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर गंभीर आरोप करत मोठी राजकीय खळबळ उडवून दिली आहे. कार्यकर्त्यांवर दमदाटी केल्याप्रकरणी राहुल नार्वेकर यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी स्पष्ट मागणी सपकाळ यांनी केली आहे. यावेळी त्यांनी भाजपसह निवडणूक आयोगावरही जोरदार टीका केली.
राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुका १५ जानेवारी २०२६ रोजी होणार असून प्रचाराचा धडाका सध्या सुरू आहे. सर्वच प्रमुख राजकीय पक्ष सत्ता मिळवण्यासाठी कंबर कसून मैदानात उतरले आहेत. काही ठिकाणी महाआघाडी, तर काही ठिकाणी स्वतंत्र लढती होत असल्याने यावेळच्या निवडणुकीत राजकीय समीकरणे पूर्णपणे बदललेली दिसून येत आहेत. अशा परिस्थितीत हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेले आरोप राज्याच्या राजकारणात केंद्रस्थानी आले आहेत.
‘नार्वेकर यांच्यावर गुन्हा दाखल व्हायलाच हवा’
हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “कार्यकर्त्यांवर दमदाटी करणे, अधिकाऱ्यांवर दबाव टाकणे आणि निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करणे, हे गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत. विधानसभा अध्यक्ष असूनही राहुल नार्वेकर यांच्याकडून अशा प्रकारचे वर्तन होत असेल, तर त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे.”
Related News
ते पुढे म्हणाले की, निवडणूक आयोगावर कोणत्याही प्रकारची कारवाई होणार नाही, अशी भावना निर्माण झाल्यामुळे निवडणूक आयोग सध्या सैराट सुटल्यासारखा वागत आहे. लोकशाहीच्या रक्षणासाठी निवडणूक आयोगाने निष्पक्ष भूमिका घ्यायला हवी होती, मात्र प्रत्यक्षात तसे घडताना दिसत नाही.
‘विशेष अधिकारांचा गैरवापर’
सपकाळ यांनी राहुल नार्वेकर यांच्यावर गंभीर स्वरूपाचे तीन आरोप केले.
आर्थिक स्वरूपाचा भ्रष्टाचार,
संविधानिक स्वरूपाचा भ्रष्टाचार,
प्रशासन आणि व्यवस्थेमध्ये लोकांना अडकवण्याचा भ्रष्टाचार.
या तिन्ही प्रकारांमध्ये राहुल नार्वेकर दोषी असल्याचा आरोप करत सपकाळ यांनी राष्ट्रपतींकडे थेट मागणी केली की, राहुल नार्वेकर यांना तात्काळ पदावरून बडतर्फ करण्यात यावे.
“विधानसभा अध्यक्ष हे घटनात्मक पद आहे. त्या पदाला जे विशेष अधिकार दिले आहेत, त्यांचे सर्रास उल्लंघन होत आहे. हे लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे,” असे सपकाळ म्हणाले.
निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह
राज्यात सध्या निवडणुकांचा दुसरा टप्पा सुरू असून ‘फ्री अँड फेअर’ निवडणूक होण्याच्या संकल्पनेलाच हरताळ फासला जात असल्याचा आरोप सपकाळ यांनी केला. नगरपरिषद निवडणुकांमध्ये खुलेआम पैसे फेकले गेले, तमाशा झाला आणि आता तोच प्रकार महापालिका निवडणुकांमध्ये सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
“बाप बडा ना भैय्या, सबसे बडा रुपया – हा तमाशा सध्या सुरू आहे. लोकशाहीचा उत्सव असलेल्या निवडणुकांमध्ये पैशाचा खेळ सुरू झाला आहे,” अशी टीका त्यांनी केली.
‘मतांचा जोगवा मागायचा असतो, विकत घ्यायचा नाही’
निवडणुकीची मूल्यव्यवस्था स्पष्ट करताना सपकाळ म्हणाले, “निवडणूक हा लोकशाहीचा सण आहे. नागरिकांनी मतदान करणं हा त्यांचा अधिकार आहे. उमेदवाराने मतांचा जोगवा मागायचा असतो, पैसे देऊन मतं विकत घ्यायची नसतात. ज्याला सर्वाधिक मतं मिळतात, तो विजयी होतो – हेच लोकशाहीचे संस्कार आहेत.”
भाजपवर ‘घोडेबाजार’चा आरोप
हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपवर थेट आरोप करत म्हटले की, “घोडेबाजार निवडून येण्याआधीच भाजपने मांडला आहे. महापालिकेत बेशरम चारित्र्य घेऊन भाजप उतरले आहेत. पैशांचा मोठा खेळ सुरू आहे आणि निवडणूक आयोग मूक साक्षीदार बनून बसला आहे.”
संविधान आणि निकोप लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही हा निषेध करत आहोत, असे सांगत त्यांनी भाजपच्या कथित कारस्थानांचा तीव्र शब्दांत निषेध केला.
निवडणूक आयोगावर गंभीर टीका
काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार दिल्याचे सांगत सपकाळ म्हणाले की, “निवडणूक आयोगाने सकाळी आमच्या पत्राला उत्तर देताना ‘पुरावे द्या’ असे सांगितले. हे ‘तो मी नव्हेच’ नाटक आयोग करत आहे.”
आम्ही आंदोलनाची भाषा केल्यानंतर चौकशीचे आदेश दिले गेले आणि त्यात काही अधिकारी दोषी आढळून आले, असेही त्यांनी स्पष्ट केले.
CCTV फुटेज गायब केल्याचा आरोप
हर्षवर्धन सपकाळ यांनी गंभीर आरोप करत सांगितले की, “टोकन देऊनही अर्ज स्वीकारले गेले नाहीत. कारण राहुल नार्वेकर स्वतः तिथे जाऊन दमदाटी करतात. दुपारी चार नंतरचं CCTV फुटेज गायब करण्यात आलं आहे.” या आरोपांमुळे प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
‘मवालीसारखी दमदाटी’ – संतप्त शब्दांत टीका
राहुल नार्वेकर यांच्या वर्तनावर टीका करताना सपकाळ म्हणाले, “एखादा मवाली जसा दमदाटी करतो, तशी दमदाटी ते करत आहेत. विधानसभा अध्यक्षासारख्या घटनात्मक पदावर बसलेला माणूस इतकं चिप वर्तन करतो, ही राज्यासाठी लाजिरवाणी बाब आहे.”
कार्यालयातील कर्मचाऱ्यांवरही आरोप
राहुल नार्वेकर यांच्या कार्यालयात कोण काम करतो, याची माहिती आम्ही घेत आहोत, असे सांगत सपकाळ यांनी दावा केला की, गुंड प्रवृत्तीचे आणि भ्रष्ट अधिकारी तिथे पदावर बसवले गेले आहेत.
“निवडणूक आयोग गप्प का आहे? अधिकाऱ्यांची चूक स्पष्टपणे दिसत असतानाही कारवाई का होत नाही?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
‘संविधानाचा मर्डर’चा आरोप
सपकाळ यांनी आरोप केला की, पक्षांतर बंदी कायद्याच्या प्रकरणात राहुल नार्वेकर यांनी सत्ताधाऱ्यांना मदत केली.
“संविधानाचा मर्डर त्यांनी केला. म्हणूनच त्यांना पुन्हा अध्यक्ष केलं गेलं,” असा आरोप करत त्यांनी नार्वेकर यांच्या भूमिकेवर तीव्र टीका केली.
राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता
महापालिका निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केलेल्या या आरोपांमुळे राज्यातील राजकीय वातावरण अधिक तापण्याची चिन्हे आहेत. भाजपकडून या आरोपांना कसे उत्तर दिले जाते आणि निवडणूक आयोग कोणती भूमिका घेतो, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
लोकशाहीच्या रक्षणासाठी संघर्ष – काँग्रेसचा इशारा
हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला की, “वेळीच सावध झालो नाही तर काळ आपल्याला माफ करणार नाही. नोटाच अधिकार आभाळात आहेत. लोकांना मतदानाचा अधिकार मुक्तपणे वापरता यावा, यासाठी आम्ही संघर्ष करत राहू.”
raeda also:https://ajinkyabharat.com/krishi-mahotsav-in-chiplun-narayan-ranena/
