अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर नगरपरिषद निवडणूक यंदा अत्यंत चुरशीची ठरली. भाजपने या निवडणुकीत आपला पारंपरिक गड कायम राखत पुन्हा एकदा राजकीय ताकद सिद्ध केली आहे. भाजपचे उमेदवार हर्षल साबळे यांनी तब्बल ७१८ मतांनी विजय मिळवत नगराध्यक्षपदावर आपले नाव कोरले आहे. या विजयामुळे भाजपने केवळ सत्ता टिकवली नाही, तर पक्षांतर्गत प्रतिष्ठेची लढाईही जिंकली असून “गडही आला आणि सिंहही…” अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
मूर्तिजापूर नगरपरिषद निवडणूक ही भाजप आमदार हरीश पिंपळे यांच्यासाठी प्रतिष्ठेची मानली जात होती. नगराध्यक्षपदाच्या या निवडणुकीत भाजपकडून उमेदवारी देण्यात आलेले हर्षल साबळे विजयी ठरल्याने आमदार पिंपळे यांची राजकीय पकड पुन्हा एकदा मजबूत झाल्याचे चित्र दिसून आले. विशेष म्हणजे, या निवडणुकीत आमदार हरीश पिंपळे यांचे भाऊ भुपेंद्र पिंपळे यांच्या गटालाही यश मिळाल्याने, भाजपने सत्तेचा गड राखण्याबरोबरच अंतर्गत राजकीय समीकरणातही बाजी मारल्याचे मानले जात आहे.
ही निवडणूक सुरुवातीपासूनच चुरशीची राहिली. मतमोजणीदरम्यान अकराव्या फेरीपर्यंत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार शेख इम्रान शेख खलील हे आघाडीवर होते. त्यामुळे शेवटपर्यंत निकालाबाबत अनिश्चितता कायम होती. वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते आणि भाजप समर्थकांमध्येही तणाव निर्माण झाला होता. मात्र, बारावी फेरी निर्णायक ठरली. या फेरीत भाजपचे हर्षल साबळे यांनी निर्णायक आघाडी घेतली आणि अखेर विजय आपल्या नावावर केला.
Related News
या निकालानंतर मूर्तिजापुरात भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. ढोल-ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत विजयाचा आनंद व्यक्त करण्यात आला. दुसरीकडे, वंचित बहुजन आघाडीच्या समर्थकांमध्ये निराशा पसरली असली, तरी त्यांनीही ही लढत अत्यंत चुरशीची आणि लोकशाहीची खरी कसोटी ठरल्याचे मान्य केले आहे.
राजकीय विश्लेषकांच्या मते, हा विजय भाजपसाठी केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेतील सत्ता टिकवण्यापुरता मर्यादित नाही, तर आगामी निवडणुकांच्या दृष्टीनेही महत्त्वाचा मानला जात आहे. मूर्तिजापुरात भाजपची संघटनात्मक ताकद, स्थानिक नेतृत्वावर असलेला विश्वास आणि शेवटच्या क्षणी मिळवलेली आघाडी, हे सर्व घटक या विजयामागे निर्णायक ठरले.
एकूणच, मूर्तिजापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपने आपला गड शाबूत ठेवत, प्रतिष्ठेची लढाई जिंकली असून “भाजपचा गडही आला आणि सिंहही…” ही म्हण या निकालामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
read also : https://ajinkyabharat.com/cattle-herders-are-aggressive-lumpi-and-laalya-khurkutacha/
