भारतातील स्वातंत्र्यलढ्यात पालघर जिल्ह्याने दिलेले मोलाचे योगदान शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात यावे, अशी ठाम मागणी अकोट तालुक्यातील मूळ रहिवासी आणि सध्या पालघरमध्ये वास्तव्यास असलेल्या सुशिक्षित तरुण विक्रम दिपक गावंडे यांनी विधानपरिषद आमदार अमोल मिटकरी यांच्याकडे केली आहे.
विक्रम गावंडे यांनी मिटकरी यांना दिलेल्या पत्रात १९४२ च्या ‘चले जाव’ आंदोलनातील पालघर तालुक्यातील पाच हुतात्म्यांच्या शौर्यगाथेचा संदर्भ देत हा इतिहास शालेय मुलांना शिकवणे अत्यावश्यक असल्याचे नमूद केले आहे. उठावादरम्यान शहीद झालेल्या या पाच स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मरणार्थ पालघर शहरात ‘हुतात्मा चौक’ (पाचबत्ती) उभारण्यात आला असून, त्यांच्यावरील माहिती आजही अनेकांना ठाऊक नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे.
शहीद स्वातंत्र्यसैनिकांची नावे पुढीलप्रमाणे :
शहीद काशिनाथ हरी पागधरे (सातपाटी)
शहीद गोविंद गणेश ठाकूर (नांदगाव)
शहीद रामचंद्र भिमाशंकर तिवारी (पालघर)
शहीद रामचंद्र महादेव जुरी (मुरे)
शहीद सुकुर गोविंद मोरे (सालवड)
गावंडे यांनी पत्रात नमूद केले आहे की, “हे पाचही हुतात्मे एखाद्या गावापुरते मर्यादित नसून संपूर्ण भारताचे आहेत. त्यांचे बलिदान भावी पिढीने जाणणे अत्यावश्यक आहे.”
त्यांच्या मते, इयत्ता ४ वी ते १० वीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये या इतिहासाचा समावेश झाल्यास विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना, प्रेरणा आणि स्वदेशीचा संदेश बळकट होईल. सध्या युवा पिढी सोशल मीडिया आणि पाश्चात्त्य संस्कृतीकडे आकर्षित होत असताना, हुतात्म्यांचे विचार आणि कार्य जाणून घेणे अधिक आवश्यक झाल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.
याशिवाय, “पालघरची ओळख फक्त मासेमारी, आदिवासी बहुल जिल्हा किंवा अणुशक्ती केंद्र एवढ्यापुरती न राहता ‘पाच शूर हुतात्म्यांचा जिल्हा’ म्हणून राज्य-देशभरात उजळून निघावी,” अशी कळकळीची विनंतीही गावंडे यांनी केली आहे.
गंभीर आणि संवेदनशील अशा या विषयाचा योग्य विचार करून हुतात्म्यांचा इतिहास पाठ्यपुस्तकात समाविष्ट करण्याबाबत निर्णय घ्यावा, असे आवाहनही विक्रम गावंडे यांनी आमदार मिटकरींना पत्राद्वारे केले आहे.
