IndiGo Flight Crisis : सततच्या उड्डाण व्यत्ययामुळे प्रवाशांना मोठा त्रास होत असून देशातील प्रमुख विमान कंपनी इंडिगोवर केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने कठोर लक्ष ठेवले आहे. हिवाळी वेळापत्रकात कंपनीच्या २,२०० पेक्षा जास्त दररोजच्या उड्डाणांमध्ये नियोजनाचे अपयश आढळल्यामुळे केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांनी इंडिगोच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पीटर एल्बर्स यांना मंगळवारी उड्डाणांमध्ये दहा टक्के कपात करण्याचा आदेश दिला.
मंत्र्यांनी एल्बर्स यांना त्यांच्या कार्यालयात बोलावून हाताची घडी घालून बसलेल्या सीईओसोबत परिस्थितीचे बारकाईने विश्लेषण केले. त्यांनी इंडिगोला सांगितले की, उड्डाणांची संख्या कमी करून सेवा स्थिर करणे आणि रद्द उड्डाणे घटवणे कंपनीचे प्रमुख प्राधान्य असावे. त्यानुसार, उड्डाणांमध्ये १० टक्के कपात करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याआधी, नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) कंपनीला ५ टक्क्यांची कपात सुचवली होती.
सुरक्षा नियमांचे पालन न झाल्यामुळे इंडिगोला मागील आठ दिवसांत हजारो उड्डाणे रद्द करावी लागली आहेत. देशातील विमान वाहतुकीतील तब्बल ६५ टक्के वाटा असलेल्या इंडिगोला फक्त २ डिसेंबरपासून ४,००० हून अधिक उड्डाणे रद्द करावी लागली. यामुळे प्रवाशांचे सुट्टीचे नियोजन, महत्त्वाच्या बैठका, लग्नकार्ये आणि व्यावसायिक कार्यक्रम प्रभावित झाले आहेत.
Related News
कंपनीच्या हिवाळी वेळापत्रकावरून दिसून आले आहे की, गेल्या वर्षीच्या तुलनेत उड्डाणांची संख्या ९.६६ टक्क्यांनी वाढली आहे, तर उन्हाळी वेळापत्रकाशी तुलना केली तर ६.०५ टक्के जास्त उड्डाणे नियोजित आहेत. मात्र, इंडिगोने ही वाढ व्यवस्थापित करण्याची क्षमता दाखवली नाही. परिणामी, सर्व मार्गांवर, विशेषतः जास्त मागणी असलेल्या मार्गांवर उड्डाणे कमी करण्याचे आणि एकेरी उड्डाणे टाळण्याचे आदेश DGCA आणि मंत्रालयाकडून दिले गेले आहेत.
यापूर्वी, DGCA ने इंडिगोच्या सीईओसह इतर उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. कंपनी कारभारातील त्रुटींची चौकशी करण्यासाठी चार सदस्यीय समिती नेमली आहे. मंत्रालयाने आश्वासन दिले आहे की नियोजनातील अपयश आणि नियमांचे पालन न केल्यामुळे प्रवाशांना त्रास देणाऱ्या कोणत्याही विमान कंपनीवर कठोर कारवाई केली जाईल.
मंत्र्यांनी लोकसभेत सांगितले की, इंडिगोच्या कपात केलेल्या उड्डाणांचे स्लॉट इतर कंपन्यांना देण्यात येणार आहेत. तसेच, प्रवाशांना त्यांचे पैसे परत मिळविण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. आतापर्यंत सुमारे ७५० कोटी रुपयांचा परतावा करण्यात आला असून, नऊ हजार बॅगांपैकी सहा हजार प्रवाशांना परत मिळाल्या आहेत. उर्वरित बॅगा बुधवारपर्यंत सुपूर्द करण्याचे नियोजन आहे.
इंडिगोच्या सीईओ पीटर एल्बर्स यांनी सांगितले की, कंपनी मंगळवारी पूर्वपदावर आल्याचा दावा करते. ग्राहकांच्या गरजा पूर्ण करताना दैनंदिन कामकाज स्थिर केले गेले आहे. ज्यांच्या उड्डाणे रद्द झाली किंवा विलंब झाला, अशा प्रवाशांना त्यांच्या संपूर्ण पैसे परत देण्यात येत आहेत आणि ही प्रक्रिया नियमित सुरू आहे.
सध्या इंडिगोच्या सहा प्रमुख शहरांतील विमानतळांवरून ४२२ उड्डाणे रद्द झाली आहेत. यात दिल्ली विमानतळावरून सर्वाधिक १५२, बेंगळुरू १२१, मुंबई ४१, हैदराबाद ५८ आणि चेन्नई ५० हून अधिक उड्डाणे रद्द झाली आहेत. हा गोंधळ सलग आठव्या दिवशीही कायम आहे.
सरकारी आदेशानुसार, उड्डाणांमध्ये कपात करून सेवा स्थिर करणे, रद्द उड्डाणे कमी करणे आणि प्रवाशांना जलद परतावा देणे ही इंडिगोची प्राथमिकता बनली आहे. या उपाययोजना केल्यानंतर कंपनीची सेवा सुरळीत होण्याची अपेक्षा आहे.
