पाचुंदा येथील दुहेरी महिला हत्याकांडातील दोन आरोपींना अवघ्या 12 तासांत अटक

दुहेरी महिला हत्याकांडातील दोन आरोपींना अवघ्या 12 तासांत अटक

माहूर–नांदेड पोलिसांची धडाकेबाज कारवाई

माहूर तालुक्यातील पाचुंदा येथे घडलेल्या दुहेरी महिला हत्याकांडाने परिसरात खळबळ उडाली होती. दुपारी 20 नोव्हेंबर 2025 रोजी दोन ते तीन वाजेच्या सुमारास दोन महिलांची दागिने लुटून गळा दाबून हत्या करण्यात आली होती. घटना घडताच माहूर पोलीस स्टेशनला माहिती मिळताच पोलिस निरीक्षक देविदास चोपडे यांनी तात्काळ जिल्हा पोलिस अधीक्षकांना कळवून विविध पथके बोलावून पंचनामा, पुरावे संकलनाची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू केली.

दरम्यान, पोलिसांनी मिळवलेल्या सुरागांवरून सुरेश दत्ता लिंगनवार (38, रा. सदोबा सावळी, ता. आर्णी, जि. यवतमाळ) आणि त्याचा साथीदार गजानन गंगाराम येरजवार (41) यांनी दोन्ही महिलांचे दागिने लुटून त्यांची हत्या केल्याची कबुली दिली आहे. घटनेनंतर सुरेश लिंगनवार हा गंगाजी नगर, सेलू (करंजी), ता. माहूर येथील नातेवाईकांच्या शेतातील आखाड्यावर लपून बसला असल्याची माहिती गोपनीय खबरीमार्फत मिळाली. त्यावरून नांदेड पोलिसांनी तातडीने तेथे धाव घेत सुरेशला ताब्यात घेतले. त्याचा साथीदार गजानन येरजवार यालाही गंगाजी नगर, सेलू येथून अटक करण्यात आली.

दोन्ही आरोपींकडून गुन्ह्याची कबुली मिळाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणातील एक मोटरसायकल आणि दोन मोबाईल फोन जप्त केले आहेत. या संदर्भात गु.र. क्र. 191/2025, कलम 103(1), 311, 309(6) भारतीय न्याय संहिता अंतर्गत दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास माहूर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक देविदास चोपडे करत आहेत.

Related News

या धाडसी आणि वेगवान कारवाईसाठी नांदेड पोलिसांचे मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे. विशेष म्हणजे, फक्त 12 तासांत आरोपींना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले. या संपूर्ण मोहिमेत पोलीस अधीक्षक नांदेड अविनाश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक भोकर अर्चना पाटील, आणि अप्पर पोलीस अधीक्षक नांदेड सुरज गुरव यांनी मार्गदर्शन केले.

अभियानात सहभागी पथकात स्थानिक गुन्हे शाखा नांदेडचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराव,सहाय्यक पोलीस निरीक्षक रवी वागळे,पोलीस उपनिरीक्षक नागनाथ तुकडे,
पोलीस उपनिरीक्षक गुंडेराव करले,पोलीस हेडकॉन्स्टेबल दारासिंग राठोड,मोहन हाके,ज्ञानोबा कवठेकर,देविदास चव्हाण,मोतीराम पवार,सिद्धार्थ सोनसळे,रितेश कुलथे,धम्मा जाधव,
मारुती मुंडे,पोलीस हेडकॉन्स्टेबल दीपक कोठवणेयांचा समावेश होता.

पोलिसांच्या या तातडीच्या आणि प्रभावी कामगिरीमुळे परिसरात समाधान व्यक्त केले जात असून नांदेड पोलिसांचा दहशतवाद, गुन्हेगारीविरुद्धचा धडाकेबाज पवित्रा पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.

read also : https://ajinkyabharat.com/top-100-cities-2025-worlds-top-100-cities-effective-list-released-from-india-or-3-cities-strong-participation/

Related News