बोलीभाषांत दडलेली सामाजिक समतेची बीजे

बोलीभाषांत

विदर्भ साहित्य संमेलनातील परिसंवादात विचारांची उजळणी

यवतमाळ : भाषेच्या पलीकडे जाणारी सामाजिक समता ही केवळ लिखाणात किंवा अभिव्यक्तीत नसून ती लोकजीवनात जगली जाते, असे प्रतिपादन विदर्भ साहित्य संमेलनातील वक्त्यांनी व्यक्त केले. विदर्भ साहित्य संघ शाखा जाम व ईश्वर फाउंडेशन दिग्रस यांच्या संयुक्त विद्यमाने येथे भरलेल्या ६९ व्या विदर्भ साहित्य संमेलनात ‘सामाजिक समता आणि बोलीभाषांचे साहित्यिक योगदान’ या परिसंवादात विदर्भातील साहित्यिकांनी भाषेच्या विविधांगी स्वरूपातून समतेचे तत्त्व उजागर केले.

उबंटू इंग्लिश स्कूल येथे दोन दिवस झालेल्या या संमेलनात ‘स्मृतीशेष राजानंद गडपायले साहित्य नगरी’ची उभारणी विशेष आकर्षण ठरली. परिसंवादाचे अध्यक्षस्थान श्रीपाद अपराजित (संपादक, महाराष्ट्र टाइम्स, नागपूर) यांनी भूषवले.

आपल्या भाषणात रावसाहेब काळे (अकोला) यांनी आर्थिक विषमतेचे वास्तव कवितांतून उलगडत, “भारतीय समाजाचे सौंदर्य विविधतेत आहे,” असा पुनरुच्चार केला. बोलीभाषा म्हणजे भारतीयत्वाची खरी ओळख असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “विविध जाती धर्मातील लोक भारतीय आहेत, आणि ही ओळख भाषेतून प्रकट होते,” असे त्यांनी नमूद केले.

काशिनाथ ब-हाडे (अमरावती) यांनी बोलीभाषा हा लोकशाही मूल्यांच्या जपणुकीचा घटक असल्याचे सांगितले. संत परंपरा, फुले–आंबेडकरांचेm लेखन आणि लोककाव्यातून उभे राहिलेले समतेचे वलय लोकभाषेनेच पुढे नेल्याचे त्यांनी सांगितले.
“भाषा वर्णांवर उभी राहत नाही, उलट वर्णवर्चस्व मोडून काढते,” या निरीक्षणास त्यांनी चक्रधर स्वामी व संत साहित्य उदाहरण म्हणून दिले. गावकुसातील बोलीच समाजाच्या सांस्कृतिक नाडीला पकडते, असे ते म्हणाले.श्रीकृष्ण काकडे (अकोला) यांनी भारतीय भाषांची विविधता आणि परस्परांत मिसळलेली बोली परंपरा अधोरेखित केली.

“मराठीतच वीस बोलींचे स्वर, आदिवासी भाषांचे मराठीकरण आणि लोककलेतून उमलणारे भाषिक प्रयोग हे ग्रामीण संस्कृतीचे भांडार आहे,” असे ते म्हणाले. गाडगेबाबा, तुकडोजी महाराज यांची वऱ्हाडी भाषेतली मांडणी समाजापर्यंत थेट पोहोचल्याचा उल्लेख त्यांनी केला.
समारोपात श्रीपाद अपराजित यांनी भाषेचे आयाम सांगताना “वर्तन आणि आत्मसंयम हीदेखील भाषेची रूपे आहेत” असा महत्त्वपूर्ण मुद्दा मांडला.
“संतपरंपरा, लोककला आणि लोकभाषा ग्रामीण मातीतून उगवली; शहराकडे जाताना ती हरवत चाललेली दिसते. भाषा फक्त शब्दांची नसते, ती अनुभवांची शिस्त आणि आचरणाची जाण असते,” असे ते म्हणाले.

दैनंदिन बोलीतला विनोद, सहजता आणि देहबोलीसुद्धा सामाजिक समतेचे साधन असल्याचे त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन कोर्तलवार यांनी केले. पुरुषोत्तम टिचुकले यांनी आभार मानले. आयोजनात मीनल राऊत, रिंकल आडे व नंदकिशोर निमगडे यांनी योगदान दिले.विदर्भातल्या बोलीभाषा, संतपरंपरा आणि ग्रामीण संस्कृतीतून लोकशाहीचे मूळ मूल्य असलेल्या ‘समता’ची बीजे कशी रुजली, याचा परखड मागोवा या परिसंवादाने घेतला. भाषेतील साधेपणा, माणुसकी आणि आपुलकी यांतच खरी सामाजिक क्रांती असल्याचा संदेश उपस्थितांना मिळाला.

read also : https://ajinkyabharat.com/india-canada-relations-2025-donald-trumps-jalphalat-canada-india-friendship-mahaplan-discussed-all-over-the-world/