आफ्रिकेच्या पूर्व किनारपट्टीवरील मादागास्कर बेटावर तरुण आणि विद्यार्थी सरकराविरोधात मोठ्या प्रमाणावर उतरले आहेत. हे आंदोलन Gen Z च्या युवा पिढीने सुरू केले असून, वीज-पाण्याची कमतरता, महागाई आणि मूलभूत सुविधांचा अभाव या मुद्यांवरून जनतेचा राग भडकला आहे. राष्ट्राध्यक्ष अँड्री राजोइलिना यांनी सोमवारी जाहीर केले की त्यांनी सरकार बरखास्त केले आहे. राजधानी अँटानानारिवो आणि इतर भागांमध्ये या आंदोलकांनी सुरुवातीला शांततापूर्ण प्रदर्शन केले, परंतु नंतर हिंसक रूप धारण केले. संयुक्त राष्ट्रांच्या मते, या आंदोलनात किमान 22 जणांचा मृत्यू झाला असून 100 हून अधिक जखमी झाले आहेत. हिंसाचारामुळे राजधानीतील परिस्थिती गंभीर झाली. काही वेळातच सुपरमार्केट, दुकाने आणि बँकांमध्ये लूटमार सुरू झाली. नेपाळप्रमाणेच, आंदोलकांनी अनेक राजकारण्यांच्या घरांवर हल्ले केले. पोलिसांनी जमावावर नियंत्रण ठेवण्यासाठी अश्रुधूर आणि रबरच्या गोळ्यांचा वापर केला, पण परिस्थिती अधिक चिघळली. अखेर राष्ट्राध्यक्ष राजोइलिना यांनी हार मानली आणि जनतेचा राग स्वीकारला. त्यांनी सरकारच्या अपयशाबद्दल माफी मागितली आणि नुकसान झालेल्या व्यावसायिकांना मदत करण्याचे आश्वासन दिले. तसेच तरुणांशी संवाद साधून परिस्थितीवर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. विशेषतः, तज्ज्ञांचे मत असे आहे की हा विरोध फक्त वीज-पाण्याच्या कमतरतेमुळे किंवा महागाईमुळे नाही, तर गेल्या अनेक वर्षांच्या प्रशासनातील दुरवस्थेचा परिणाम आहे. जागतिक बँकेच्या 2022 च्या आकडेवारीनुसार, मादागास्करची सुमारे 75% लोकसंख्या दारिद्र्यरेषेखाली जीवन व्यतीत करत आहे, ज्यामुळे या आंदोलनाची सामाजिक आणि आर्थिक मुळे स्पष्ट होतात. तरुणांच्या Gen Z आंदोलनाने देशातील राजकीय परिस्थितीच बदलून टाकली असून, सरकारच्या कामकाजावर जनता कडक नजर ठेवत आहे.
read also:https://ajinkyabharat.com/octobarmadhyhe-maidanavar-blast/
