रिसोड, दि. 29 :धनगर, वंजारी तसेच बंजारा समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करू नये तसेच त्यांना अनुसूचित जमातीचे आरक्षण लागू करू नये, या मागणीसाठी आज रिसोड शहरात आदिवासी समाजातर्फे भव्य विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले.मोर्चामध्ये महिला, पुरुष, लहान मुले व वयोवृद्ध मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पारंपरिक पोशाखात सजलेल्या युवकांनी मोर्चाचे विशेष आकर्षण ठरले. विविध मागण्यांच्या घोषणा देत शहरात वातावरण दुमदुमले होते.मोर्चाची सुरुवात नगरपरिषदेजवळून करण्यात आली. सिव्हिल लाईन मार्गे जात मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. येथे तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांना निवेदन सादर करण्यात आले.निवेदनात नमूद करण्यात आले की, बंजारा, वंजारी व धनगर समाजाने अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट व्हावे, यासाठी विविध मागण्या केल्या आहेत. मात्र, 1950 च्या हैद्राबाद गॅझेटमध्ये बंजारा समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये कुठेही उल्लेख नाही. उलट 1952 च्या गॅझेटमध्ये त्यांचा समावेश ओबीसीमध्ये असल्याचे नमूद आहे. त्यामुळे या समाजांचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश हा असंवैधानिक ठरेल, असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले.निवेदनात पुढे म्हटले आहे की, सध्या अनुसूचित जमातींमध्ये 45 जातींचा समावेश असून त्या समाजांपैकी अनेक अजूनही मागासलेले आहेत. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या धनगर, बंजारा व वंजारी समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षणाचा लाभ देऊ नये. अशा निर्णयामुळे आदिवासी समाजामध्ये असंतोष निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू शकतो, असेही निवेदनात नमूद करण्यात आले.या मोर्चाला माजी आमदार संतोष टारफे यांनी मार्गदर्शन केले. मोर्चाचे आयोजन आदिवासी युवक कल्याण संघ, घोंसर, ता. रिसोड व अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद यांच्या वतीने करण्यात आले होते.मोर्चात प्रमुख उपस्थिती : माजी आमदार संतोष टारफे, माजी जि.प. सदस्य सतीश पाचपुते, माजी जिल्हा नियोजन अधिकारी महादेव डाखोरे, बाबाराव गोदमले, अविनाश पंधरे, आनंदराव पवार, ओंकार सरकुटे (जि.प. सदस्य), नवनाथ बोन्डे, रामदास मोधे, दत्तात्रय सोनुळे, मोहन रिट्ठे, एकनाथ धोत्रे, कैलास सुरकुटे, पृथ्वीराज ठाकूर, डॉ. अमोल घुकसे, प्रभू जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
read also : https://ajinkyabharat.com/telhara-tehsil-shetkari-shetamzurancha-grand-assood-front/
