अकोट :चोहोट्टा बाजार येथील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान सेवा पंधरवडा अंतर्गत समाधान शिबिर व जनसंवाद कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
या शिबिरात फेरफार अदालत, रस्ता अदालत आणि जिवंत सातबारा मोहीम राबवण्यात आली. शिबिरात देवर्डा येथील शेतातील पाण्याचा बांध आपसी समजुतीने मोकळा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आणि शेतकऱ्यांना प्रशस्तिपत्र देण्यात आले. यावेळी १५ सातबारे वाटप करण्यात आले .कार्यक्रमादरम्यान नागरिकांना जात प्रमाणपत्र, नॉन-क्रिमिलिअर, अधिवास व उत्पन्न दाखले मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले. तसेच आरोग्य, पुरवठा, भूमी अभिलेख, पंचायत समिती कृषी व महावितरण विभागांच्या स्टॉलद्वारे विविध योजनांची माहिती नागरिकांना देण्यात आली. तहसीलदार डॉ. सुनील चव्हाण यांनी सांगितले की, चोहोट्टा बाजार मंडळातील १५० शेतरस्त्यांचे सीमांकन करून ते अतिक्रमणमुक्त करण्याची व्यापक मोहिम सुरू करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे शेतमाल वाहतूक सुलभ होईल आणि रस्त्यांचे कायमस्वरूपी रक्षण होईल. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आमदार रणधीरभाऊ सावरकर होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून तहसीलदार डॉ. सुनील चव्हाण, सह-दुय्यम निबंधक नितीन कुलकर्णी, नायब तहसीलदार ए. यू. खान, मनोज मानकर, गटविकास अधिकारी वानखडे मॅडम, भूमिअभिलेख अधीक्षक सोनलाल पालवे, तालुका कृषी अधिकारी आणि मंडळातील सर्व सरपंच उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नायब तहसीलदार सुधीर थिटे यांनी केले, तर आभार प्रदर्शन ग्राम महसूल अधिकारी अतुल वानखडे यांनी मानले. मंडळ अधिकारी विशाल शेरेकर, ग्राम महसूल अधिकारी — महेश सरकटे (चोहोट्टा, केळीवेळी), अतुल वानखडे (हानवाडी), गणेश धात्रक (किनखेड), सचिन चिकार (दनोरी), शिवराज दाभाडे (करोडी), दिपाली तेलगोटे (देवर्डा), महसूलमित्र — किशोर राठोड, गोपाल अरबट, शिवचरण वानखडे, राजू ओवे यांनी समन्वय साधून शिबिर यशस्वी केले. शिबिरास शेकडो नागरिक आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा उपक्रम शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यास, शासकीय सेवा थेट नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक प्रभावी पाऊल ठरला आहे.
read also:https://ajinkyabharat.com/bcci-kadun-expressed-intense-anguish/
