मुंबईत पुन्हा एकदा पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. शहरात आणि उपनगरात सकाळपासूनच रिमझिम पावसानंतर मुसळधार सरींनी हजेरी लावली असून, रस्त्यांवर आणि रेल्वे मार्गांवर त्याचा परिणाम दिसून येतोय. हवामान विभागाने मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. पुढील २४ तासांत अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली असून प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
लोकल वाहतूक विस्कळीत: रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई लोकलच्या वेळापत्रकावर परिणाम झाला आहे. काही गाड्या उशिराने धावत असून, काही ठिकाणी पाण्याचे साचलेले थर रेल्वे ट्रॅकवर दिसत आहेत. मध्य रेल्वे विभागात आज मेगाब्लॉक घेण्यात आल्याने लोकल सेवांमध्ये अडथळा निर्माण झाला आहे. विद्याविहार-ठाणे दरम्यानच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकांवर काम सुरु आहे. ट्रान्सहार्बर मार्ग आणि पश्चिम रेल्वेवरही ब्लॉक घेण्यात आला असून त्यामुळे गाड्या उशिराने धावत आहेत.
रस्ते वाहतूक ठप्प: मुंबईतील सखल भागांमध्ये पाणी साचल्याने रस्त्यांवर वाहतूक मंदावली आहे. अंधेरी सबवे, किंग्स सर्कल, धारावी, सायन, कुर्ला परिसरात पाण्याचे थर वाढत आहेत. वाहनचालकांना वाहतूक विभागाकडून सूचना देण्यात आल्या आहेत की शक्यतो सार्वजनिक वाहतूक वापरावी आणि पाणी साचलेल्या मार्गांवरून प्रवास टाळावा.
Related News
प्रशासनाचा इशारा: पालघर, ठाणे, कल्याण-डोंबिवली, वसई-विरार या परिसरात जोरदार पावसाचा अंदाज आहे.
प्रशासनाने “अत्यावश्यक कामांशिवाय घराबाहेर पडू नका” असा इशारा दिला आहे.दुपारच्या सुमारास भरतीची वेळ असल्याने पाणी साचण्याची शक्यता अधिक आहे. नागरिकांना सुरक्षित स्थळी राहण्याचं आणि विजांच्या कडकडाटात झाडाखाली न थांबण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
हवामान विभागाचा अंदाज: पुढील ३ तासांत मुंबई, ठाणे, रायगड, नाशिक आणि पुणे घाट माथ्यावर ४० ते ५० किमी प्रतितास वेगाने वादळी वारे आणि विजांचा कडकडाट अपेक्षित आहे. काही ठिकाणी अतिवृष्टीसह पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता.
नागरिकांसाठी सूचना: घराबाहेर पडताना हवामानाचा अंदाज तपासा,सखल भाग टाळा,प्रशासनाच्या सूचना पाळा,विजांच्या गडगडाटात मोबाईल वापरणे टाळा,वाहन सावकाश चालवा. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, हा पाऊस पुढील २४ तास तीव्रतेने सुरू राहणार आहे. त्यामुळे मुंबईकरांनी सतर्कता बाळगून सुरक्षित राहणं गरजेचं आहे.
read also:https://ajinkyabharat.com/chief-minister-fadnavis-yavatamadhyaye/