छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत सुरू असलेल्या पंधरवड्यात (१७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर) मेहकर तालुक्यातील देऊळगाव माळी येथे भव्य महाराजस्व अभियान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात महसूल, कृषी, पुरवठा विभाग आदींचे अधिकारी व कर्मचारी हजर राहून नागरिकांच्या विविध समस्या सोडविण्यास मार्गदर्शन केले.शिबिरामध्ये प्रमाणपत्रे, रेशनकार्ड, आधार कार्ड, प्रधानमंत्री सन्मान योजना, निराधार, दिव्यांग बांधवांच्या अडचणी याबरोबरच शेत पांदण रस्ते व कृषीविषयक समस्या यावर तत्काळ तोडगा काढण्यात आला. काही लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.या कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी रवींद्र जोगी, नायब तहसीलदार प्रवीण देशमुख, कृषी अधिकारी टी. ए. मेहेत्रे, पुरवठा निरीक्षक एन. बी. बोराडे, मंडळ अधिकारी आर. एफ. आव्हाळे, विदर्भ पटवारी संघटनेचे अध्यक्ष व्ही. के. गारोळे, किसान सेना जिल्हाध्यक्ष एन. ए. बळी उबाठा, ओबीसी महासंघाचे विभागीय सचिव वसंतराव मगर आदींसह ग्रामविकास अधिकारी, महसूल-कृषी विभागाचे कर्मचारी व स्थानिक मान्यवर उपस्थित होते.अध्यक्षस्थानी असलेल्या उपविभागीय अधिकारी रवींद्र जोगी यांनी थेट ग्रामस्थांशी संवाद साधत शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली व नागरिकांच्या अडचणींवर उपाय सुचविले. त्वरित सुटू न शकलेल्या समस्यांची नोंद घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना लवकरात लवकर तोडगा काढण्याचे आदेश दिले.ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेल्या या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी तलाठी, मंडळ अधिकारी, महसूल व ग्रामपंचायत कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
read also : https://ajinkyabharat.com/2120-rupees/