शेतकरी पुत्राचा आगळावेगळा आंदोलनप्रकार

जीवन प्राधिकरणाच्या दुर्लक्षाविरोधात ग्रामपंचायत सदस्याचा ‘आदिशक्ती’ अवतार

जीवन प्राधिकरण कार्यालय माजिप्र कार्यालयातून फरार

बाळापूर तालुक्यातील टाकळी निमकर्दा येथील ग्रामपंचायत सदस्य व शेतकरी पुत्र अक्षय साबळे याने लक्ष्मी घटस्थापनेच्या दिवशी आगळावेगळ्या पद्धतीने आंदोलन छेडले. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (माजिप्र) अकोला कार्यालयात त्याने आदिशक्तीचे रूप धारण करून आपला संताप व्यक्त केला.

जल जीवन मिशन अंतर्गत तालुक्यात रस्ते खोदून केलेल्या पाईपलाईन टाकण्याच्या कामामुळे गावातील व तालुक्यातील अनेक रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. नागरिकांना चालणेही अवघड झाले असून, अपघातांच्या घटनाही वाढत आहेत. हे काम ईगल इन्फ्रा कंपनीकडे सोपविण्यात आले होते. करारामध्ये स्पष्ट नमूद असूनही, दोन वर्ष उलटून गेल्यानंतरही रस्ते दुरुस्त झालेले नाहीत.

स्थानिकांनी वारंवार तक्रारी करूनही माजिप्र कार्यालयाने त्याकडे दुर्लक्ष केले, उलट कंपनीला पाठीशी घालण्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे संतप्त होऊन अक्षय साबळे यांनी आदिशक्तीचे रूप घेऊन आंदोलन केले.

या आंदोलनामुळे प्राधिकरणाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, “महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या गंभीर तक्रारीची दखल घेणार का?” असा सवाल संपूर्ण तालुक्यात उपस्थित होत आहे.

या आंदोलनामुळे टाकळी तसेच बाळापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू असून, नागरिकांचे लक्ष आता माजिप्र कार्यालयाच्या पुढील निर्णयाकडे लागले आहे.

read also:https://ajinkyabharat.com/lively-pahoon-doctor/