IND vs PAK : अभिषेक-शुभमनची धडाकेबाज सलामी

धडाकेबाज सलामी… पण ‘इम्पॅक्ट प्लेअर’ कोण ?

आशिया चषक 2025 सुपर-4 फेरीत भारतानं पाकिस्तानवर 6 विकेट्सनी दणदणीत विजय मिळवला. अभिषेक शर्मा आणि शुभमन गिलनं दमदार सुरुवात करून विजयाचा पाया रचला. मात्र, ‘इम्पॅक्ट प्लेअर ऑफ द मॅच’चा मान तिसऱ्याच खेळाडूला – तिलक वर्माला मिळाला. बीसीसीआयनं या विजयी क्षणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.पाकिस्ताननं प्रथम फलंदाजी करत 5 बाद 171 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतानं 19व्या षटकात लक्ष्य गाठत विजयावर शिक्कामोर्तब केलं. अभिषेक शर्मानं 39 चेंडूत 74 धावा (6 चौकार, 5 षटकार) ठोकल्या, तर शुभमन गिलनं 28 चेंडूत 47 धावा (8 चौकार) केल्या. पहिल्या विकेटसाठी दोघांनी 105 धावांची भागीदारी करत भारताच्या विजयाची पायाभरणी केली.मात्र, सामना संपल्यानंतर इम्पॅक्ट प्लेअरचा पुरस्कार तिलक वर्माला देण्यात आला. कर्णधार सूर्यकुमार यादव शून्यावर बाद झाल्यानंतर तिलकनं संयमी आणि आक्रमक फलंदाजी करत भारताला विजयाच्या उंबरठ्यावर नेलं. त्यानं 19 चेंडूत नाबाद 30 धावा (2 चौकार, 2 षटकार) ठोकल्या. त्याच्या खेळीमुळे भारतानं पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये सलग सातव्यांदा विजय मिळवला.भारत-पाकिस्तान टी-20 इतिहासात आतापर्यंत 15 सामने खेळले गेले असून, त्यापैकी 12 सामन्यात भारत विजयी ठरला आहे. आशिया चषकातील पुढील सामन्यात भारतासमोर बांगलादेश आणि श्रीलंकेचं आव्हान असेल.

read also :https://ajinkyabharat.com/kantara-chapter-1cha-trailer-displayed/