नवी दिल्ली : भारत-पाक क्रिकेटमध्ये मैदानावरील चुरस सर्वश्रुत आहे, पण यावेळी मैदानाबाहेरही शब्दयुद्ध पेटलं आहे. माजी पाकिस्तानी कर्णधार शाहिद आफ्रिदी आणि माजी भारतीय स्टार इरफान पठान यांच्यात तुफान आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
किस्सा आणि वादाची ठिणगी
काही महिन्यांपूर्वी इरफान पठाननं एका मुलाखतीत 2006 च्या पाकिस्तान दौऱ्याचा किस्सा सांगितला होता. त्याने सांगितलं की, विमानप्रवासादरम्यान आफ्रिदीनं त्याच्याशी “कसा आहेस बाळा?” असं बोलत हात फिरवला होता. पण त्याला आवडलं नाही आणि त्याने अब्दुल रज्जाककडे पाहत हसत-हसत आफ्रिदीवर टोला मारला – “बहुतेक डॉग मीट खाल्लंय, म्हणून एवढं भुंकतोय.“हा मजेशीर किस्सा सांगितल्यानंतर आता आफ्रिदीने संताप व्यक्त केला आहे.
आफ्रिदीचा पलटवार
पाकिस्तानी ‘समा टीव्ही’वर बोलताना आफ्रिदी म्हणाला –
“इरफान पठान खोटं बोलतोय. अब्दुल रज्जाकलाही हा किस्सा आठवत नाही. तो जर खरा मर्द असेल तर माझ्या डोळ्यात डोळे घालून बोलेल. मागे मागे बोलण्यात काही अर्थ नाही.”आफ्रिदीने पुढे पठानवर थेट टीका करत म्हटलं, “त्याला आयुष्यभर हेच सिद्ध करायचं आहे की तो किती महान भारतीय आहे आणि पाकिस्तान्यांच्या विरोधात किती उभा राहतो.”
खेळावरूनही हल्ला
केवळ किस्स्यावर न थांबता आफ्रिदीने पठानच्या खेळावरही बोट ठेवलं. तो म्हणाला –
“इरफानला संधी मिळाली ती फक्त त्यामुळे की त्यावेळी भारताकडे दर्जेदार वेगवान गोलंदाज नव्हते. 120-125 किमी वेगाने टाकणारेही त्या काळात टीममध्ये खेळायचे.” एकूणच, आफ्रिदीच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा भारत-पाक क्रिकेटमधील वैराची ठिणगी मैदानाबाहेरही रंगतदार झाली आहे. सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा पेटली आहे.
read also : https://ajinkyabharat.com/ganun-gya-special-features/
