फक्त एका कारणामुळे लोकेश राहुल वर्ल्ड कपच्या संघाबाहेर, आगरकर यांनी सांगितली खरी गोष्ट

फक्त एका कारणामुळे लोकेश राहुल वर्ल्ड कपच्या संघाबाहेर

मुंबई : लोकेश राहुलची भारताच्या टी-२० संघात एंट्री होईल, अशी आशा सर्वांनाच होती. कारण यष्टीरक्षण आणि सलामीची जबाबदारी राहुल हा नेहमीच पार पाडतो. त्याचडबरोबर राहुलकडे क्रिकेटचा चांगला अनुभवही आहे. पण तरीही त्याची भारताच्या टी-२० वर्ल्ड कपच्या संघात निवड झाली नाही. पण राहुलची भारतीय संघात का निवड झाली नाही, याचे खरे कारण आता निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर यांनी स्पष्ट केले आहे.

राहुलने भारताचे कर्णधारपदही भूषवले आहे. भारतीय संघासाठी राहुल एक महत्वाचा खेळाडू आहे. त्यामुळे भारताच्या संघात त्याला नेहमीच संधी दिली जाते. पण यावेळी मात्र जेव्हा टी-२० वर्ल्ड कपचा संघ निवडला गेला, तेव्हा त्याला मात्र संधी मिळाली नाही. हा चाहत्यांसाठीही एक धक्का होता. पण राहुलची फक्त एका कारणामुळेच भारताच्या टी-२० संघात का निवड करण्यात आली नाही, असे आगरकर यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.

राहुलबाबत आगरकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले की, ” लोकेश राहुल हा एक दर्जेदार खेळाडू आहे. त्याच्या गुणवत्तेबाबत कोणाच्याही मनात शंका नाही. आयपीएलमध्ये तो सलामीला येऊन फलंदाजी करत आहे. ऋषभ पंत हा दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येतो. त्याचबरोबर संजू सॅमसन हा मधल्या फळीत कोणत्याही स्थानावर येऊन फलंदाजी करू शकतो. आम्हाला मधल्या फळीत येऊन फलंदाजी करणारा खेळाडू हवा होता. निवड करताना आम्ही खेळाडूंच्या स्थानाबद्दलही विचार केला. त्यामुळेच आम्ही लोकेश राहुलची निवड करू शकलो नाही, हे एकमेव कारण आहे. पण राहुल हा एक दमदार खेळाडू आहे, याबद्दल आमच्या कोणाचेही दुमत नव्हते.”

Related News

लोकेश राहुल हा भारताचा भविष्यातील कर्णधार असल्याचे म्हटले जात होते. पण यावेळी तर टी-२० वर्ल्ड कपच्या संघातच त्याला संधी मिळालेली नाही. त्यामुळे यापुढेही तो भारताच्या टी-२० संघात नसेल, असे म्हटले जात आहे. त्यामुळे यापुढे राहुल हा फक्त भारताच्या कसोटी आणि वनडे संघातच पाहायला मिळू शकतो.

सध्या राहुल लखनौ सुपर जायंट्स संघाचा कर्णधार आहे. पण या आयपीएलमध्ये त्याला अजूनही छाप पाडता आलेली नाही.

Related News