राज्यावर संकट!

हवामान खात्याचा मोठा इशारा

मुंबई :राज्यात गेल्या तीन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला असून, भारतीय हवामान विभागाने पुढील २४ तास महाराष्ट्रासाठी मोठा इशारा दिला आहे. अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली असून, शेतकरी आणि नागरिक दोघेही मोठ्या अडचणीत आले आहेत.

मुसळधार पावसाचा हजेरी

मुंबईत सकाळपासूनच मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली. कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड तसेच कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज असून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईसह उपनगरांमध्येही अलर्ट जारी आहे.

शेतीचे मोठे नुकसान

सततच्या पावसामुळे राज्यातील हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे.

मुक्ताईनगर तालुका : तब्बल ७ हजार हेक्टरपेक्षा जास्त शेतीपिकांचे नुकसान झाले असून, ३५ गावांमध्ये मोठे नुकसान झाले आहे. केळी, कापूस, सोयाबीन आणि मका पिके पाण्यात बुडाल्याने शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले.

जालना : दोन दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसाने अनेक भागात घरात पाणी घुसले. नागरिकांच्या जीवनावश्यक वस्तू व अन्नधान्याचे मोठे नुकसान झाले. अजूनही काही भागात पाणी साचलेले आहे.

उमरगा (कदेर परिसर) : पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरू असून सखल भागात पाणी साचले आहे.

नद्यांना पूर, धरणांचे दरवाजे उघडले

नांदेडमध्ये गोदावरी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. विष्णुपुरी धरणाचे १४ दरवाजे उघडण्यात आले असून, तब्बल १ लाख ६२ हजार क्युसेक पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. त्यामुळे नांदेड शहरातील काही भाग पाण्याखाली गेले आहेत. वसरणीतील पंचवटी नगरात नदीचे पाणी घुसले असून, महापालिकेच्या अग्निशमन दलाने आठ जणांना बोटीने सुरक्षित बाहेर काढले.

पुढील २४ तास महत्त्वाचे

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे पावसाचे ढग महाराष्ट्रावर थांबलेले आहेत. हवामान विभागाने १९ सप्टेंबरपर्यंत पावसाचा जोर कायम राहील असा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे पुढील २४ तास राज्यासाठी धोक्याचे असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

read also :https://ajinkyabharat.com/kothrudamadhye-a-life-serious-wound/