उत्तर पश्चिम मुंबईचा तिढा अखेर सुटला, शिंदे गटात लेट एन्ट्री घेणारे रवींद्र वायकर थेट उमेदवार

रवींद्र वायकर

मुंबई : महायुतीतील उत्तर पश्चिम (वायव्य) मुंबई लोकसभा मतदारसंघाचा तिढा अखेर सुटला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत नुकतेच प्रवेश करणारे माजी मंत्री रवींद्र वायकर यांना उत्तर पश्चिम मुंबईतून तिकीट जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतर्फे ठाकरेंच्या शिवेसेने उमेदवार अमोल कीर्तिकर यांच्याविरुद्ध रवींद्र वायकर असा सामना रंगणार आहे. वायकर उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

“लोकसभा निवडणूक – २०२४ साठी मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून श्री रवींद्र वायकर यांचे नाव घोषित करण्यात आले आहे. त्यांना लोकसभा निवडणुकीसाठी हार्दिक शुभेच्छा” अशी पोस्ट शिवसेनेच्या अधिकृत एक्स हँडलवरुन शेअर करण्यात आली आहे. विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर यांनी माघार घेतल्यानंतर उत्तर पश्चिम मुंबईत उमेदवाराचा शोध सुरु होता.

मुंबई महापालिकेचा मैदानासाठीचा आठ हजार चौरस मीटरच्या राखीव भूखंडावर फसवणुकीने पंचतारांकित हॉटेल उभारणी आणि मनी लॉंडरिंगप्रकरणी रवींद्र वायकर यांची सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीकडून चौकशी करण्यात आली होती. या कारणामुळे भाजपकडून वायकरांच्या उमेदवारीला विरोध करण्यात आला होता. ज्यांच्यावर घोटाळ्याचे आरोप केले, त्यांचा प्रचार कसा करायचा, असा सवाल भाजपकडून विचारला जात होता.