“मी कोणत्याही ग्रुपचा भाग नाही!”

"मराठी इंडस्ट्रीतील गटबाजीच्या विरोधात मी प्रामाणिकपणे काम करत आहे"

मुंबई – मराठी चित्रपटसृष्टीमध्ये गटबाजी म्हणजेच ग्रुपिझ्म हा सतत चर्चेचा विषय असतो. आता या विषयावर थेट प्रतिक्रिया प्रसिद्ध मराठी अभिनेत्री ऋतुजा बागवेने दिली आहे. एका मुलाखतीत तिने स्पष्टपणे सांगितले की, मराठी इंडस्ट्रीत ग्रुपबाजी आहेच आणि प्रत्येक क्षेत्रात असते. मात्र, तिला स्वतः त्यात सहभागी व्हायचे नसल्याचे सांगितले.

ऋतुजा म्हणाली, “गटबाजी इथे आहेच आणि प्रत्येक क्षेत्रात असते. पण मी त्याच्यावर रडत बसत नाही. कारण माझा मूळ स्वभावच फार बोलका नाही. त्यामुळे मी कोणत्याही ग्रुपचा भाग होत नाही. संपर्क मिळवणं, गप्पा मारणं, काम मिळेपर्यंत थांबणं – हा माझा स्वभावच नाही. हे चुकीचं आहे की नाही माहीत नाही. पण मला हे सगळं करता येत नाही.”

तिने पुढे सांगितले, “माझ्या हातात जी गोष्ट आहे, ते मी नक्की करते. इतकं प्रामाणिकपणे काम करायचं की चार लोकांनी स्वतःहून त्याची दखल घेतली पाहिजे. मला रातोरात मिळणारी प्रसिद्धी नकोच. हळूहळू मिळाली तरी चालेल. पण माझ्या कामामुळे लोकांनी मला ओळखायला पाहिजे, असं मला वाटतं.”

ऋतुजा बागवेने ‘शहीद भाई कोतवाल’ चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केले. तसेच ‘नांदा सौख्य भरे’ या मालिकेतील भूमिका तिच्या लोकप्रियतेत भर घालत आहेत. याशिवाय ‘ह्या गोजिरवाण्या घरात’, ‘स्वामिनी’, ‘पुढचं पाऊल’, ‘तू माझा सांगाती’, ‘चंद्र आहे साक्षीला’ यांसारख्या अनेक मालिका आणि चित्रपटांतून ऋतुजाने आपली छाप सोडली आहे.

या वक्तव्यामुळे मराठी सिनेप्रेमींमध्ये चर्चा रंगली असून, इंडस्ट्रीतील गटबाजीविषयी आणखी प्रकाश टाकण्याची गरज निर्माण झाली आहे.

READ ALSO :https://ajinkyabharat.com/ashram-shahet-shocked-incident/