जी एम सी मध्ये शिपाई बनले अधिकारी

गरीब रुग्णांना औषधांपासून वंचित ठेवण्याचा प्रकार!

दुपारी दोननंतर जीएमसी औषध वितरण विभागाचे गेटबंद

शरद शेगोकार
अकोला : जिल्ह्यातील गावागावातून ६० ते ७० किलोमीटर प्रवास करून गोरगरीब रुग्ण अकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (जीएमसी) फक्त २० रुपयांत आरोग्य तपासणी व मोफत औषधे मिळतील या आशेने येतात. मात्र, जीएमसीतील औषध वितरण विभागाच्या कडक टायमिंग आणि मनमानी कारभारामुळे अनेक रुग्णांना औषधाऐवजी त्रास सहन करावा लागत असून, रिकाम्या हाताने परत जावे लागते. ही धक्कादायक बाब नुकतीच उघडकीस आली आहे.
जीएमसीतील ओपीडी सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरू असते. डॉक्टरही याच वेळेत रुग्णांची तपासणी करतात. तपासणीस दोन ते तीन तास लागल्याने अनेक रुग्णांना औषध घेण्यासाठी उशीर होतो. परंतु, दुपारी नेमके २ वाजताच औषध विभागाचे गेट चपराशी बंद करून टाकतो.
८ सप्टेंबर रोजी तब्बल ४० ते ५० रुग्ण व त्यांचे नातेवाईक औषध घेण्यासाठी गेटसमोर उभे असताना चपराशीने कुणाचीही दखल न घेता गेट बंद केले. यामुळे संतप्त रुग्णांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
आम्ही खूप दूरवरून आलो आहोत, कृपया आम्हाला औषध घेण्यासाठी गेट उघडा, अशी त्यांनी विनंती केली. मात्र, चपराशीने कोणाचेही ऐकून न घेता गेट उघडण्यास नकार दिला.
जर वेळ संपल्यानंतर गरीब रुग्णांना औषधे दिली जात नसतील, तर हा विभाग सकाळी नेमके ८ वाजताच नियमितपणे काम सुरू करतो का, हे तपासणे आवश्यक आहे. दुपारी २ नंतर मुख्य औषध विभाग बंद झाल्यानंतर अपघात कक्षातून काही औषधे दिली जातात, परंतु ती अपुरी असतात. त्यामुळे रुग्ण मुख्य औषध विभागावरच अवलंबून राहतात. मोफत औषधे न मिळाल्याने अनेकांना खाजगी मेडिकलमधून महागडी औषधे विकत घ्यावी लागत आहेत.
यामुळे जीएमसी औषध विभाग व खाजगी मेडिकल यांच्यातील साटेलोट्याची जोरदार चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. गोरगरीब रुग्णांच्या जिवाशी खेळणाऱ्या या प्रकाराची रुग्णालय प्रशासनाने तातडीने अंतर्गत चौकशी करून जबाबदार कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. नव्याने रुजू झालेले अधिष्ठाता डॉ. सोनवणे यांच्यासाठी हा पहिला मोठा कसोटीचा क्षण आहे. जर त्यांनी ठोस पाऊल उचलले नाही, तर रुग्णालय प्रशासनाची विश्वासार्हता मोठ्या प्रमाणात ढासळेल. तसेच आरोग्यमंत्री प्रकाश आंबिटकर यांनी या प्रकरणाकडे लक्ष देऊन जीएमसीकडून प्रत्यक्ष अहवाल मागवून, गरीब रुग्णांना न्याय मिळवून द्यावा, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.

बॉक्स
या वेळी रुग्णसेवक पराग गवई यांनी तातडीने धाव घेत चपराशीला जाब विचारून गेट उघडायला भाग पाडले. यामुळे रुग्णांना अखेर औषधे मिळाली मात्र दररोज अश्या प्रकारे गरीब रुग्णांचा छळ केला जात असल्याने याची चौकशी होणे गरजेचे आहे.

Related News

READ ALSO :https://ajinkyabharat.com/32-rashtriya-vijeetya-women-khedunchaya-inspirational-pravasacha/

Related News