चंद्रपूर – कोरपना तहसीलतील सांगोडा ग्रामपंचायतीत पांदन रस्ता, नाली रपटा, अंगणवाडीच्या वस्तू, शाळेतील शैक्षणिक साहित्य, अपंगांना निधी वाटप आणि वैयक्तिक शौचालय यासारख्या कामांमध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.ग्रामस्थ शुभम ढवस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, माजी सरपंच सचिन बोंडे (२०१५–२०२०) यांच्या कार्यकाळात रस्त्यांवर आणि नाल्यांवर खर्च दाखवला गेला, परंतु प्रत्यक्ष काम झालेले नाही. अंगणवाडी, शाळा आणि अपंगांसाठी निधी दिल्याची नोंद कॅश बुकमध्ये आहे, तरी वस्तू किंवा पैसे प्रत्यक्ष मिळालेले नाहीत. सरपंचांनी स्वतःच्या घराचा शौचालय लाभ घेऊन सरकारी निधीचा गैरवापर केला, असेही आरोप आहेत.सध्याचे सरपंच संजना सचिन बोंडे असून, त्यांच्या पती गावपातळीवर कोणत्याही पदाशिवाय ग्रामपंचायतीचे काम सांभाळत असल्याचेही ग्रामस्थांनी सांगितले.ग्रामस्थांनी जिल्हा आणि तालुका प्रशासनाला पत्राद्वारे त्वरित कारवाईची मागणी केली आहे, अन्यथा १५ सप्टेंबरपासून कोरपना पंचायत समिती कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.पत्रकार परिषदेत विठोबा दिनकर बोंडे, शुभम संजय ढवस, रवींद्र भाऊराव देवलकर, जयभारत धोटे, आकाश रागीट, निशांत पिंपळकर आणि गौरव पाचभाई आदी उपस्थित होते.
READ ALSO : https://ajinkyabharat.com/balapuramadhye-ganesh-visarjan-enthusiast/
